वागदे येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेत केली आत्महत्या

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वागदे येथील साईनाथ चंद्रकांत साटेलकर ( रा.वागदे कणकवली वय – ३६ ) यांनी आपल्या वागदे येथील राहत्या घरात कोणीही नसताना घरातील लोखंडी बारला गळफास घेतल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत त्यांचे भाऊ लहान भाऊ राजू चंद्रकांत साटेलकर यांनी या प्रकाराबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साईनाथ चंद्रकांत साटेलकर यांची पत्नी, आई व दोन मुलं ही सकाळी पाहुण्यांकडे गेली होती. दरम्यान सायंकाळी पाहुण्यांकडून आल्यावर दरवाजा उघडल्यावर साईनाथ हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. लागलीच त्यांच्या आई आणि पत्नी यांनी त्यांचा लहानभाऊ राजू याला बोलावून घेतले.

मात्र नेमकं त्यांनी गळफास का घेतला याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाहीय. सलग दोन दिवसांत कणकवलीत मागो – माग गळफास घेण्याचे प्रकार घडल्याने त्यांचे मोबाईल तपासून पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

साईनाथ साटेलकर यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व ११ वर्षाची मुलगी तसेच १४ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस मनोज गुरव करत आहेत.

error: Content is protected !!