जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पर्यटनावर आधारीत उद्योग व्यवसायाकडे वळावे – प्रसाद पारकर
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पर्यटन जिल्हा म्हणून उदयास येत असून खारेपाटण हे शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली शहर असून जिल्हासह येथील व्यवसायिकांनी पर्यटनावर आधारित छोटे मोठ्या व्यवसायाकडे वळावे, असे भावपूर्ण उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी आदर्श व्यापारी संघटना खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण येथील व्यापाऱ्याच्या वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्राजल कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या व्यापारी मेळाव्याचे उद्घाटन खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, राजू जठार, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, कणकवली अध्यक्ष दीपक बेलवलकर, तळेरे व्यापारी अध्यक्ष स्वप्नील कल्याणकर, खारेपाटण ग्रा. प. सदस्य गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, जिल्हा व्यापारी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य योगेश गोडवे, अनंत गांधी, खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अविनाश गाठे, सचिव रमेश जामसंडेकर, प्रकाश मोहीरे, खजिनदार संजय धाक्रस, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
“व्यापारी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग फार कमी असायचा. मात्र, खारेपाटण व्यापारी असोसिएशन आदर्श जिल्ह्यातील इतर संघटनांनी घेऊन महिलांचा व्यवसायात सहभाग वाढवावा. तसेच तरुणांनी व्यापारी संघटनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन जिल्ह्याला प्रगतीपथावर घेऊन जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा व्यापारी संघटनेचे कार्यवाह नितीन वाळके यांनी या कार्यक्रमात व्यापारी बांधवांना मार्गदर्शन करताना काढले. यावेळी जिल्हा संघटनेचे सहकार्यवाह राजू जठार, कणकवली तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अनुशंगाने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत आदर्श व्यक्तीचा सन्मान खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद पारकर व कार्यवाह नितीन वाळके यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण येथील युवा उद्योजक व सामजिक कार्यकर्ते सुकांत वरूणकर यांचा यशस्वी युवा उद्योजक म्हणून सन्मान करण्यात आला. याबरोबरच सामजिक बांधिलकी जोपासत आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे खारेपाटण येथील डॉक्टर प्रसाद मालंडकर व डॉ.उमेश बालन तसेच खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या ज्येष्ठ महिला व्यापारी म्हणून सुनीता प्रदीप शेट्ये व ज्येष्ठ पुरुष व्यापारी म्हणून सदानंद विष्णू देवस्थळी याबरोबरच आदर्श युवा व्यापारी म्हणून तुषार रमेश कोळसुलकर यांचा जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
खारेपाटण व्यापारी असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्नेहमेळावा कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेले जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पारकर व सर्व मान्यवरांचे खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खारेपाटण व्यापारी बांधवांच्या वतीने सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. तर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खारेपाटण श्री देव विष्णू मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. तर रात्री सद्गुरू संगित विद्यालय सावंतवाडी यांचा “हे सुरानो चंद्र व्हा…” हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गुरव यांनी केले. तर प्रस्ताविक अध्यक्ष प्राजल कुबल तसेच आभार रमेश जामसंडेकर यांनी मानले. यावेळी खारेपाटण येथील असंख्य नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













