कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत नवरात्रोत्सव सण साजरा करण्यावरून तणाव निर्माण झाला असून दोन गट आमनेसामने ठाकले आहेत. नवीन कुर्ली वसाहतीत गेली अनेक वर्षे दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मात्र यावर्षी नवीन कुर्ली वसाहत नवरात्रोत्सव मंडळात फूट पडून हरीश पाटील गट शिवसेना शिंदे गटात सामील झाला. तर विद्यमान अध्यक्ष असलेले प्रशांत दळवी आणि हरीश पाटील समर्थ सुमारे 130 ग्रामस्थ या दोन्ही गटाने नवरात्रोत्सव सण साजरा करण्यावर आपला दावा सांगितला. याबाबत पोलीस प्रशासनाने आपला अहवाल सादर केला. त्यानुसार कणकवली कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी विद्यमान अध्यक्ष प्रशांत दळवी गटाला नवरात्रोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. मात्र आज घटस्थापनेदिवशी दुर्गामाता प्राणप्रतिष्ठापना दिवशी मात्र दोन्ही गट आमने सामने ठाकले असून आणीबाणीचा प्रसंग उभा राहिला आहे. दरम्यान याबाबत आता तालुका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते यावर पुढील प्रसंग अवलंबून असल्याचे चित्र आहे.
फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत तणाव; नवरात्रोत्सव वरून दोन गट आमने सामने











