ओरोस शासकीय रुग्णालयानंतर सीपीआर कोल्हापूर येथे वैद्यकीय उपचारासाठी सूरज पाटील ला केले होतं रेफर
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : बिल्डर सिद्धांत परब याला फसवणुकीच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेला सावंतवाडी पोलीस ठाण्यात निलंबित पोलीस उपनिरीक्षक सूरज जगन्नाथ पाटील ( वय 34, मूळ रा.गाळगल्ली, कापुसखोड, जि.सांगली ) याने अटकपूर्व जामीनासाठी ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयात 17 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला आहे. बिल्डर सिद्धांत परब कडून दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी लाखाची लाच स्वीकारताना एपीआय सागर खंडागळे ला 13 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. ही रक्कम सूरज पाटील याने सांगितल्यानुसार सागर खंडागळे ने स्वीकारल्याचे एसीबी च्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. हा गुन्हा घडताना पीएसआय सूरज पाटील हा बंदोबस्तासाठी असल्याने एसीबी च्या जाळ्यात अडकला नव्हता.त्यानंतर प्रकृती अस्वास्थ असल्याने सूरज पाटील ओरोस येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. तेथून त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर मधील सीपीआर मध्ये ऍडमिट करण्यात आले. 13 ऑक्टोबर रोजी एसीबी चा छापा पडल्यापासून सूरज पाटील हा मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे.त्यामुळे त्याला अटकही करता येणे शक्य नाही. त्यातच त्याने एसीबी ला शरण न जाता थेट सिंधुदुर्ग विशेष जिल्हा न्यायालयात 17 ऑक्टोबर रोजी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. ओरोस शासकीय रुग्णालयातून पुढील वैद्यकीय उपचार करायचे असतील तर गुन्हा दाखल असलेला आणि पोलिसांच्या दृष्टीने तपासकामासाठी अटक करणे आवश्यक असलेल्या संशयित आरोपीला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय आलेल्या सीपीआर मध्ये दाखल करतात. मात्र अगदी 34 वर्षे वय असलेल्या सूरज पाटील ला अशी कोणती गंभीर व्याधी झाली आहे ? हे प्रश्न अनाकलनीय आहेत. आपल्या पोलीस अधिकारीपदाचा गैरफायदा घेत लाच मागणाऱ्या ऐन 34 वर्षीय पीएसआय सूरज पाटील याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर जिल्हा न्यायाधीश काय निर्णय घेतात ? याकडे समस्त सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.












