मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदुर्गनगरीमध्ये उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर भवनाचे उद्घाटन सोमवारी 20 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आले आहे
या सोहळ्याच्या नियोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि जेष्ठ पत्रकारांची संयुक्त बैठक शुक्रवारी सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. या बैठकीमध्ये सोमवारी १३ रोजी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हेही उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पत्रकार संघ आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजनच्या जुन्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर होते. यावेळी सचिव देवयानी वरसकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, संतोष वायंगणकर, खजिनदार संतोष सावंत, सहकार्यवाह महेश रावराणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सोमवारी 20 फेब्रुवारीला नव्याने उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर भवनाच्या उर्वरित कामाबाबत चर्चा झाली. शिल्लक काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत एकमताने ठरवण्यात आले. या भवनासाठी जमीन खरेदी करून देणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह ज्यांचे ज्यांचे या भवनाच्या निर्मितीच्या कामासाठी हातभार लागले. त्या सर्व लोकप्रतिनिधींचा, अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, भवनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्यातचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. या विशेष बैठकीमध्ये राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, अभिमन्यू लोंढे, अशोक करंबळेकर, विद्याधर केनवडेकर, महेश सरनाईक, रमेश जोगळे, अमोल टेमकर, संजय वालावलकर, हरिश्चंद्र पवार, महेश रावराणे, विकास गावकर, प्रभाकर धुरी, बाळ खडपकर, संतोष राऊळ, राजन नाईक, सुहास देसाई, विजय पालकर, चंद्रकांत सामंत, रवी गावडे, रामचंद्र कुडाळकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर आदींसह तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.













