सामाजिक व राजकीय कार्याचा सविस्तर अहवाल सादर; पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद
मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषद आमदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मतदारसंघासह व्यापक स्तरावर केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा सविस्तर लेखाजोखा आमदार प्रमोद जठार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण देखील उपस्थित होते.
आमदार म्हणून कार्यरत असताना जनतेच्या विविध प्रश्नांना दिलेले प्राधान्य, सामाजिक उपक्रम, विकासकामांसाठी केलेले प्रयत्न, नागरिकांशी सातत्याने साधलेला संवाद तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळातील कामकाजाचा हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सादर करताना आमदार जठार यांनी भविष्यातील कार्याचा संकल्पही व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रमोद जठार यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले. जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेले राहून विकासकामांना गती देणे, सामाजिक बांधिलकी जपत जनहिताच्या विषयांना प्राधान्य देणे आणि संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाकडून मिळालेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे पुढील जनसेवेच्या वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत, अशी भावना आमदार जठार यांनी व्यक्त केली. जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन या बळावर आगामी काळातही सामाजिक विकास आणि जनहिताच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमदार जठार यांनी इतर मान्यवर नेत्यांनाही आपल्या सामाजिक व राजकीय कार्याचा अहवाल सादर केला. त्यांच्या कार्याची दखल घेत मान्यवरांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.












