भातशेतीच्या नुकसानीपोटी मिळणारी प्रति गुंठा ८७ रुपयांची भरपाई तुटपुंजी !

नुकसानभरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक मदत द्या; जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी

बांदा (मंगल कामत) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसातील अनियमितता आणि प्रतिकूल हवामानामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत भातशेतीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना प्रति गुंठा केवळ ८७ रुपये भरपाई मिळणार असल्याची माहिती समोर येत असल्याने ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे मत व्यक्त करत, नुकसानभरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांना निवेदन देण्याची मागणी केली आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे भातशेती संकटात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. यंदा पावसातील अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी भाताची पिके करपून गेली. शेतकऱ्यांनी नांगरणी, चिखलणी, रोपवाटिका, लावणी, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीवर मोठा खर्च केला. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

प्रति गुंठा ८७ रुपयांत शेतीचा खर्च कसा भरून निघणार?

नुकसानग्रस्त भातशेतीसाठी प्रति गुंठा ८७ रुपये भरपाई मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, भातशेतीसाठी प्रत्यक्षात करावा लागणारा खर्च आणि पिकाच्या नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता ही रक्कम अत्यंत अपुरी असल्याचे राऊळ यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक हातचे गेल्यानंतर एवढ्या कमी रकमेतून शेतीचा खर्च भरून काढणे अशक्यप्राय असून, पुढील हंगामासाठी भांडवल उभे करणेही शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भातपीक करपण्याचे संकट असतानाच, अलीकडील अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले उभे पीक तसेच कापणी करून ठेवलेले भात भिजून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली असून, आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दुहेरी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची मागणी

जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे नुकसानभरपाईच्या निकषांचा फेरविचार करून भरपाईच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च, पिकाच्या नुकसानीचे प्रमाण आणि जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन विशेष आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, अलीकडील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची स्वतंत्रपणे दखल घेऊन आवश्यकतेनुसार नव्याने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना वाढीव भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करावा आणि मदतीची रक्कम वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

भातशेती हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे साधन आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक कुटुंबांचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केवळ औपचारिक मदत न देता प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरीव आर्थिक सहाय्य देणे आवश्यक आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून नुकसानभरपाईचे निकष बदलण्यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घ्यावा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!