सावंतवाडी (प्रतिनिधी): चैत्राली मेस्त्री हिच्या खून प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान पोलिसांनी मृत महिलेला चटके दिलेला स्टोव्ह जप्त केला आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. रत्नागिरी-खेड येथील विवाहिता चैत्राली निलेश मेस्त्री हिचा तिचा चुलत दिर संशयित संदेश मेस्त्री याने सावंतवाडी सबनिसवाडा येथील भाड्याच्या घरात जब्बर मारहाण करून ओढणीने गळफास लावून खून केला होता. या खुनानंतर ती जिवंत आहे कि मेली हे पाहण्यासाठी त्याने तिला स्टोव्ह पेटवून चटके देखील दिले होते. हा सर्व प्रकार करून देखील संशयित याने चैत्राली हिने आत्महत्या केली आहे, असा बनाव करीत तसा घटनाक्रम निर्माण करीत पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली होती. मात्र त्याचा हा बनाव त्यावच्यावरच उलटला आणि पोलिसांनी विवाहितेच्या खून प्रकरणाचा अवघ्या २ दिवसात छडा लावत त्याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी खाकी हिसका दाखवताचं त्याने खुनाची कबुली दिली. याप्रकरणी संशयित मेस्त्री याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी संशयित मेस्त्री याला पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता त्याला अधिक तपासासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी यां गुन्ह्यातील महत्वाचे ओढणी, दोरी, तसेच स्टोव्ह आदी पुरावे जप्त केले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अधिकारी करीत आहेत.
खुनाच्या गुन्ह्यात संदेश मेस्त्रीला 3 दिवसांची पोलीस कोठडी












