ओरोस (प्रतिनिधी) : आत्ता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे, आता नाही तर कधीच नाही अशी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी पुन्हा एकदा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 डिसेंबर 2023 पासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
जुन्या पेन्शन या कर्मचारी यांच्या जिव्हाळयाचे मागणीसह रिक्त पदे भरती, आठव्या वेतन आयोगाचे तात्काळ गठन करणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तात्काळ करणे व इतर 18 मागण्यासाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यानिमित्त शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाईक रॅली काढून सहकुटुंब माझे कुटुंब माझी पेन्शन असा मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व महसुल, तलाठी, ग्रामसेवक , आरोग्य कर्मचारी, आयटीआय , सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा , वस्तु सेवा कर या सह सर्व विभागाचे 17 हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणेत येणार असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी संघटना अध्यक्ष व समन्वय समिती सरचिटणीस सत्यवान माळवे यांनी माहिती दिली. तसेच 14 डिसेंबर पासुन होणारे बेमुदत संपामध्ये सर्व कर्मचारी यांनी सहभागी होणेचे आवाहन देखील केलेले आहे.
तसेच जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील अधिकारी महासंघ देखील यामध्ये सहभागी होत असुन 14 डिसेंबर 2023 रोजी सामुदायिक रजा आंदोलन करणेत येत आहे. सर्व कर्मचारी बंधू-भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना या मोर्चामध्ये वेळेवर सहभागी व्हावे एनपीएस(NPS) कर्मचाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन आणि आपल्या पुढील भवितव्याचा विचार करून सदर मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शासनाला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन माळवे यांनी केले आहे. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस राजन वालावलकर, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, सचिन माने, शाम लाखे, कोषाध्यक्ष, जुनी पेन्शन हक्क संघटना व प्रमुख मागर्दशक प्रविणजी पाताडे, संजय पवार यांचे सह विवीध प्रवर्ग निहाय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जुनी पेन्शन धारक आणि पेन्शनर्स यांनीही बेसावध राहू नका.आपली पेन्शन भविष्यात धोक्यात आहे. हे लक्षात घ्या. नेहमीप्रमाणे आपण सर्वांच्या पुढे राहून हे आंदोलन यशस्वी करायचे आहेच. शिवाय आपल्या पाठीला पाठ लावून NPS धारक सर्व कर्मचारी सुद्धा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील आणि हे आंदोलन यशस्वी करतील. हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा व्हावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक सर्वांनी सहकुटुंब कोणताही संकोच न करता सदर संप आंदोलनात सहभागी व्हा.












