पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीची मासिक सभा बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेत पंचायत समिती सदस्या मानसी मराठे यांनी फोंडा-घोंणसरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले.
फोंडा-घोणसरी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रिक्षाचालकांच्या दररोजच्या फेऱ्या होत असल्याने खराब रस्त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागत असून, त्याचा थेट परिणाम प्रवाशांनाही भोगावा लागत आहे.
तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याऐवजी फोंडा-घोणसरी रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण (कार्पेट) करण्यात यावे, अशी पं. स सदस्या मानसी मराठे यांनी ठाम मागणी केली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून फोंडा-घोणसरी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे मानसी मराठे यांनी सांगितले. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.











