सावंतवाडी (प्रतिनिधी) : ‘मनसंवाद, महाराष्ट्र’ या संस्थेमार्फत ‘माध्यमिक विद्यालय, डेगवे’ या हायस्कुलमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने कुमारवयीन मुलांसोबत संवादसत्र घेण्यात आले. ‘मनसंवाद’ हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करीत आहे. ‘मनसंवाद’ मार्फत वेगवेगळ्या विषयांवर समुपदेशन केले जाते. तसेच दर महिन्याला ‘बेसिक अँड ऍडव्हान्स कौसिलिंग ऑनलाइन कोर्स’ शिकवला जातो. तसेच ‘मनसंवाद’ मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

‘शालेय मानसिक आरोग्य’ हा उपक्रम शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये राबवला जातो. ‘कुमारवय’ हे असे वय असते जिथे आपल्या शारीरिक बदलांबरोबरच मानसिक आणि भावनिक बदल होत असतात. हे बदल होत असताना मुलांमुलींना नव्या गोष्टींचं आकर्षण वाटू लागतं. ‘मी सोडून आपण’ ही जाणीव तयार होत असताना त्यात अधिकाराची भावना निर्माण होत असते. ‘प्रेम’ या शब्दाच्या जवळजवळ जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते. पण या प्रेमाच्या बाबतीत फसवणूक झाल्यावर पूर्ण जीवनाबाबतीत निराशा उत्पन्न होते. यामधून त्या निरागस भावनेला कसे समजून घेता येईल? नक्की प्रेम म्हणजे काय? ते कसे ओळखावे? त्यामधून होणारी फसवणूक कशी रोखता येईल? या साऱ्या प्रश्नांना घेऊन संवाद साधला गेला.

‘मनसंवाद’ चे समुपदेशक अमोल कदम यांनी मुलांशी संवाद साधत म्हणाले की, आपण ज्या वयात आता पदार्पण करत असतो ते वय हे ‘मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे’ असे असते. त्यामुळे आपली जी काही गफलत होते ती, आपल्याला समजून येत नसते. प्रेम ही नैसर्गिक भावना आहे परंतु त्यासोबतच आकर्षण आणि वासना ह्या दोन भावना पण त्याला जोडलेल्या असतात. या तिन्ही भावना ह्या नैसर्गिक आहेत. आणि त्या प्रत्येक माणसांमध्ये असतात. परंतु त्यांच्या मधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. आताच्या ‘सोशल मीडिया’ च्या काळात मुलामुलींनी मोबाईलचा वापर करत असताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. या विषयाची सुरुवात ‘राजू आणि रविना’ ही गोष्ट सांगून केली. फेसबुक वरच्या मुलामुलींचा प्रोफाइल फोटो बघून रिक्वेस्ट स्वीकारणे हे चुकीचे आहे. आपल्या कुटुंबातील विश्वासू व्यक्तींना आपल्या मित्रमंडळीबाबत माहिती असली पाहिजे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी! आताच्या रिसेन्ट काळात फोफावलेला ‘सेक्सटोर्शन’ नावाचा प्रकार! जिथे मुलांना एखादी समोरील मुलगी (मग तिच्या मागे मोठी रॅकेट टीम पण असू शकते.) त्या मुलाला व्हिडीओ कॉल करून नग्न होते, आणि तो मुलगा तिला पाहतानाचा विडिओ सदर मुलगी रेकॉर्ड करून त्या मुलाला पाठवते. आणि तो विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार सध्या ट्रेंड मध्ये आहे. यामुळे काही निष्पाप लोकांना आत्महत्येला सामोरे जावे लागले आहे. अशा गोष्टींना बळी न पडता त्यापासून परावृत्त होणे महत्त्वाचे आहे. मुलांनी या बाबतीत सावधान राहणे गरजेचे आहे. हा संवाद खूपच मजेशीर आणि रंजकपणे संपन्न झाला.
यावेळी हायस्कुल मुख्याध्यापक एस.के.सावंत म्हणाले की, असे संवादसत्र घेणे खूप गरजेचे आहे. आताची मुलंमुली सोशल मीडियामध्ये अडकून गेली आहे. या वयात ते कुठेतरी भरकटत असतांना त्यांचा कुठेतरी तोल जाऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे म्हणत त्यांनी या सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसंवादचे समुपदेशक यांनी विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षकांचे आभार मानून संवादाची सांगता झाली.












