हरकुळखुर्द विद्यामंदिरला शैक्षणिक साहित्य भेट
कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर हरकुळखुर्द या विद्यालयातील सन 1979-80 यावर्षीच्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 44 वर्षांनी एकत्र आले. स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून एकमेकांशी हितगूज साधतानाच शालेय जीवनातील जुन्या आठवणींमध्ये हे सर्वजण रमून गेले होते. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे ऋण फेडताना हरकुळखुर्द विद्यामंदिरला शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांना खाऊ व भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
हरकुळखुर्द विद्यामंदिरचे हे माजी विद्यार्थी व्हॉट्सअॅपच्या माध्यातून एकत्र आले आहेत. या गु्रपमध्ये जवळपास 50 माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. गु्रपवर संवाद साधत असतानाचा प्रत्यक्षात भेटण्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करत हे सर्वजण मालवण-तोंडवली येथील समुद्रकिनारी एकत्र आले होते. विविध क्षेत्रात कार्यरत असणारे हे सर्वजण स्नेहमेळाव्यातील गप्पांमधून पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत दिसले. त्यामध्ये सेवानिवृत्त सीनियर पोलिस इन्स्पेक्टर दिलीप रासम, आर जे ठाकूर विद्यालय, ठाणेच्या सेवानिवृत्त प्रिन्सिपल शोभा वालावलकर, सेवानिवृत्त सहाय्यक वाहतूक निरीक्षक भास्कर रासम, कंपनी कन्सल्टंट प्रमोद ढोलम, सेवानिवृत्त एसटी मेकॅनिक चंद्रकांत सावंत, सेवानिवृत्त कंपनी मॅनेजर मनोहर पाटील, बँक कन्सल्टंट प्रकाश कासारडेकर इत्यादी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे ऋण म्हणून शाळेला शालोपयोगी वस्तू, सर्व शिक्षकांना भेटवस्तू, मुलांना खाऊ व मुलांसाठी खेळाचे साहित्य तसेच त्यांचे त्यावेळचे आदर्श शिक्षक श्री. जोशी यांना भेटवस्तू प्रदान केल्या. माजी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल शिक्षक संस्था पदाधिकारी व विद्यार्थ्यांकडून आभार मानण्यात आले.
















