काळसे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
चौके ( अमोल गोसावी ) : ” नेहमी उच्च विचार ठेवा आणि नेहमी सज्जन व्यक्तींसोबत रहा तसेच पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचाराने श्रीमंत व्हा.” असे प्रतिपादन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सी. ए. हेमंत परब यांनी काळसे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे, व स्व. जयश्री वामन प्रभु कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ शनिवार ६ जानेवारी रोजी संस्था अध्यक्ष सी. ए. हेमंत परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक राजेंद्र केसरकर आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत केरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष योगेश राऊळ , सचिव केशव सावंत, खजिनदार सिताराम परब , संचालक शरद गोसावी , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेक , सरपंच विशाखा काळसेकर , राजेंद्र परब , अण्णा गुराम आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सकाळच्या सत्रात पारितोषिक वितरणासह विविध क्रिडास्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धामध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकौशल्याने बनविलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यानंतर मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष सी. ए. हेमंत परब यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून स्वतः अध्यक्षपद स्विकारल्यानंतर केलेल्या कामांचा आढावा सादर केला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे राजेंद्र केसरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सकाळी लवकर उठा, विचार चांगले ठेवा , आणि छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून स्वतःमध्ये अनुकूल बदल घडवून आणा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे प्रशांत केरवडेकर यांनी बदलती शिक्षण पध्दती आणि शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देउन सी. ई. टी. परीक्षेसाठी आतापासूनच तयार रहावे असे सांगत बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश परब यांनी केले व आभार रूपेश जाधव यांनी मानले
संध्याकाळच्या सत्रातील स्पर्धात्मक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्था अध्यक्ष सी. ए. हेमंत परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सचिव केशव सावंत , खजिनदार सिताराम परब , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर हे उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मुला मुलींच्या नृत्यांचे परिक्षण करून संस्थेच्या वतीने पारितोषिके देण्यात आली, परीक्षक म्हणून ऐश्वर्या माइणकर , स्नेहलता हडकर यांनी काम पाहिले.














