मालवण ओवळीये गावातील घटना
नंदकुमार आंगणे कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान
चौके ( अमोल गोसावी ) :
मालवण तालुक्यातील ओवळीये येथील नंदकुमार मनोहर आंगणे कुटुंबीय यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. कुटुंबीय झोपेत होते. जाग येताच कुटुंबियांनी आरडाओरडा केला. आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा सुरु केला. मात्र आग अधिकच भडकत होती. उशिराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत घर व घरातील साहित्य जळून खाक झाले.
घराला आग लागल्याचे कळताच नंदकुमार आंगणे हे आई, पत्नी व मुलगा यांसह प्रसंगवधान राखत घराबाहेर आले. घराला लागून असलेल्या गोठ्यात पाळीव जनावरे होती. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र भडकलेल्या आगीत शेतकरी कुटुंबीय असलेल्या आंगणे यांचे घर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आग लागल्याची माहिती मिळताच माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनास याबाबत माहिती देण्यात आली आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आंगणे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.