खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये नुकतेच ‘नशामुक्त भारत अभियान – २०२४ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तर कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून या शिबिराला उपस्थित होते.
या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून खारेपाटणमधील प्रसिद्ध डॉक्टर शंकर उर्फ बाळा राणे हे उपस्थित होते.यावेळी प्राचार्य संजय सानप, खारेपाटण पोलीस नाईक उद्धव साबळे, खारेपाटण पोलीस पाटील दिगंबर भालेकर, वरिष्ठ शिक्षक अजय गुरसाळे, सुरेश करांडे, सचिन शेट्ये हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रस्तावनेमध्ये प्राचार्य संजय सानप यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनते मुळे होणारे तोटे याविषयी मार्गदर्शन केले.तर पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनते मुळे होणारे गुन्हे व त्यावरील शिक्षा याविषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे डॉक्टर शंकर उर्फ बाळा राणे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये व्यसनाधीनतेमुळे आपल्या शरीराची होणारी हानी तसेच सामाजिक, आर्थिक, शारीरिक व मानसिक हानीविषयी मार्गदर्शन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहायक शिक्षक श्री सचिन शेटये यांनी केले.यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













