कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कणकवलीच्या वतीने नांदगाव गावातील दुष्काळग्रस्त शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी सभापती हर्षदा वाळके यांनी अशोक मांजरेकर, सुनील तोरस्कर, सोनू बापार्डेकर, दीपक चव्हाण, केशव चव्हाण, अनंत वाळके आणि रामचंद्र वाळके या शेतकऱ्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीमुळे भातशेतीवर झालेला परिणाम, पिकांची स्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पाहणी करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पाहणीवेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य गौरी परब तसेच कृषी सहाय्यक गजानन पवार उपस्थित होते.














