भाविक, पालक, ग्रामस्थांकडून मुलांच्या संस्कारक्षम कलेचे कौतुक !
फोंडाघाट अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने केंद्र शाळा नंबर १ मुलांकडून “एक तास कृष्णा” साठी उपक्रम उत्साहात !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज श्रीदेव राधाकृष्ण मंदिरात, सुरू असलेल्या, अखंड हरिनाम सप्ताह च्या पाचव्या दिवशी मंदिर, सकाळी जीवन शिक्षण विद्यामंदिर केंद्र शाळा नंबर १ च्या विविध रंगीबेरंगी, वेशभूषाधारी मुला-मुलींच्या किलबिलाटाने रंगून गेला. शाळेपासून निघालेल्या दिंडीत गोपाळकृष्णा पासून सखी राधेपर्यंत आणि सुदाम्यापासून मामा कंस पर्यंत कृष्ण सख्यांच्या वेशभूषा पेठेत आकर्षण ठरल्या. पुढे चाललेली पुस्तक शिक्षण पालखी लक्षवेधी होती. सोबत पालक महिलाही होत्या.
मंदिराच्या प्रांगणात गोपाळांच्या उत्साहाला उधाण आले. सुरुवातीला “गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी sss” च्या भजनानंतर गोपाळा गोपाळा ‘देवकीनंदन गोपाळाssss’ चा गजर वातावरण प्रसन्न करीत होता. त्यानंतर लेझीम, झीम्मा, फुगडी, आणि मनमोहक कृष्णा सवे गोपिकांचे रासनृत्य, विविध नाच- गाणी यांनी मोहोल आनंददायी, प्रसन्न केला. आणि पुन्हा एकदा राधा- कृष्णाच्या जयघोषात मराठमोळ्या संस्कारक्षम, केंद्र शाळेच्या रंगीत – संगीत उपक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रेवडेकर गजानन सावंत, मुख्या. श्रेया नानचे, सहशिक्षिका वेदांती नारकर, रंजना पाटील यांचे सह असंख्य पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले.














