जानवली नदीवर गणपती साना येथे ब्रिज मंजूर

8 कोटी 8 लाख निधीची प्रशासकीय मंजुरी ; कणकवली शहराच्या विकासाचे मोठे पाऊल

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कणकवली शहराचा मागील 5 वर्षांत सर्वांगीण विकास केला. कणकवली शहराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार, केंद्रीयमंत्री राणे, पालकमंत्री चव्हाण, आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून जानवली नदीवर गणपती साना येथे ब्रिज मंजूर झाला असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 8 कोटी 8 लाखांच्या निधीची प्रशासकीय मंजुरी या ब्रिजसाठी मिळाली असल्याचेही समीर नलावडे यांनी सांगितले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. 80 मीटर लांब आणि 11.67 मिटर रुंदीचा, 6 मीटर उंचीचा हा ब्रिज असणार आहे. दुतर्फा वाहतूक असलेला हा ब्रिज वर्षभरात पूर्णत्वास जाणार आहे.जानवली आदर्शनगर ते कणकवली शहराला जोडणारा हा आणखी महत्वाचा ब्रिज असणार आहे. मागील कित्येक वर्षांची या ब्रिज ची मागणी आता पूर्णत्वास गेली असून यामुळे कणकवली शहराचा आणखी विकास होणार आहे. जानवली गणपती साना येथे बारमाही वाहणारा धबधबा या ब्रिज खाली येणार असल्यामुळे साहजिकच एक विलोभनिय असे पर्यटन स्थळ नागरिकांना याठिकाणी पाहता येणार आहे. मागील 5 वर्षांत कणकवली शहरात नवीन डीपी रस्त्यांचे जाळे निर्माण केले , पोदार सीबीएसई पॅटर्न हायस्कुल उभे राहिले , विविध विकासाचे प्रकल्प उभे केले आहेत. जानवली नदीवरील गणपतीसाना येथिल हा ब्रिज कणकवली शहराच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे असेही समीर नलावडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!