रत्नागिरी (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी सकाळपासून एसीबीकडून झाडाझडती सुरू आहे. राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहचले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान, उत्पन्नापेक्षा तब्बल 118 टक्क्यांनी संपत्ती जास्त असल्यामुळे राजन साळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं रत्नागिरी एसीबीकडून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांनी अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, राजन साळवी यांनी 3 कोटी 53 लाखांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसीबीनं केला आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख इतकी आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा जमा केल्याचा आरोप राजन साळवींवर लावण्यात आला आहे.
एसीबीकडून गुन्हा दाखल केल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी लेचापेचा शिवसैनिक नाही,परिणामांची पर्वा करत नाही असं राजन साळवी म्हणाले आहेत. माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाला हे दुर्दैव आहे, शिंदे गटात न गेल्यानं परिणाम भोगावे लागणार असल्याचं राजन साळवींनी म्हटलं आहे.













