चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर येथील शेतमांगरानजिक इतर गुरांसोबत बांधून ठेवलेल्या गायीच्या वासरावर मंगळवार दिनांक २३ रोजी सकाळी ७ वाजता तीन रानटी कुत्र्यांनी हल्ला चढवून जखमी केले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेली यांनी वासरावर उपचार करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्यात अवघ्या एक वर्षाच्या त्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे काळसे येथील शेतकरी श्री सुनिल दत्तात्रय मालवणकर यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन काळसे आणि धामापूर परीसरात गेले काही दिवस या हिंस्त्र रानटी कुत्र्यांचे वास्तव्य असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे. हे कुत्रे परीसरातील शेतकऱ्यांची गुरे ढोरे , बकऱ्याना भक्ष बनवण्याच्या यांच्या वर हल्ला चढवत आहेत. त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण या कुत्र्यांपासून भविष्यात शेतात काम करणारी छोटी मुले आणि माणसांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या धोकादायक हिंस्त्र रानटी कुत्र्यांचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.













