गोपुरी आश्रमातर्फे प्रगतशील शेतकरी प्रल्हाद धोंडी सावंत व अनिल साबाजी सावंत यांचा विशेष सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कासरल ता.कणकवली येथील प्रगतशील शेतकरी ज्यानी ‘वांगे’ या पिकाचे राष्ट्रीय पातळी पेटंट प्राप्त केले अशा प्रल्हाद धोंडी सावंत व अनिल साबाजी सावंत या दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समवेत काम केलेले अप्पासाहेब पटवर्धन यांचे सहकारी आर.टी. उर्फ आबा मर्गज यांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सन्मान प्राप्त दोन्ही शेतकऱ्यांनी कोकणचे गांधी पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांचे विचार स्वीकारून कासरल गावात राहून शेतीमधून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल या दोन शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना आर.टी. मर्गज म्हणाले, ग्रामीण भागातील शेती उत्पादन वाढायला हवे हा अप्पासाहेबांचा विचार होता. शेती टिकून राहिली तरच भारतीय अर्थव्यवस्था टिकून राहणार आहे. अलीकडे शासन मोफत धान्य देण्याची जी योजना राबवत आहे त्यामुळे देशातला सर्वसामान्य माणूस आळशी बनत चालला आहे. कर्जमुक्ती योजनांमुळे नागरिकांना आपण बँकांकडून घेतलेले कर्ज परत करण्याचे भान राहत नाही हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी आपण श्रमप्रतिष्ठेची प्रत्यक्ष कृती करणे जरुरीचे आहे हे अप्पासाहेब पटवर्धन यांच्या एकंदरीत विचारांचे खरे सूत्र होते. या सूत्राचा स्वीकार देशपातळीवर होण्याची आवश्यकता आहे. अप्पासाहेब पटवर्धन यांनी ८० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबवले. सध्या शासन अप्पासाहेबांचे विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु यात अप्पासाहेब पटवर्धन यांचा उल्लेख होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे असेही आर.टी. मर्गज म्हणाले. या कार्यक्रमात गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी गोपुरीच्या कार्याचा आढावा घेतला. शेतकरी बांधवांच्या सन्मानामागची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर कमिटीचे सदस्य संदीप राणे तसेच जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, निवृत्त शिक्षक धाकू तानवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना अनिल सावंत यांनी गोपुरी आश्रमामार्फत आमचा सन्मान होतोय याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला या सन्मानामुळे शेतीत अजूनही प्रयोग करण्याची प्रेरणा मिळेल असे सांगितले. या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष विजय सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, संचालिका अर्पिता मुंबरकर, संभाजी ब्रिगेडचे जावेद खान, कवी श्रेयश शिंदे, गोपुरीचे कार्यकर्ते सदाशिव राणे, बाळकृष्ण सावंत, विनायक साबळे एकता दिव्यांग संस्थेचे सचिन साधये व त्यांचे कार्यकर्ते, हळवलचे प्रगतशील शेतकरी उत्तम राणे, सुरेश रासम, राजन कुशे, विशाल गुरव, नताशा हिंदळेकर, प्रियांका मेस्त्री, वृदाली हजारे, अक्षय मोडक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी मानले.

error: Content is protected !!