भ्रष्ट तलाठ्याला आ. वैभव नाईक यांचा दणका; तडकाफडकी झाली बदली

कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी राज्य शासनाचे महसूल विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या तरतुदीअंतर्गत कुडाळ तालुक्यातील वालावल सजाचे तलाठी किरण सुधाकर सोनवणे यांची गोठोस तलाठी सजा येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

किरण सोनवणे हे तलाठी ३ वर्षे चेंदवण वाळू टप्प्यात काम करीत होते. प्रशासकीय बदलीच्या वेळी त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा वालावल वाळू टप्प्यात बदली करून घेतली. वालावल व चेंदवण या दोन तलाठी सजा एकमेकांना लागून आहेत आणि या दोन्ही सजांच्या कार्यक्षेत्रात वाळू उत्खनन होत असते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या नियमानुसार लिलाव पद्धतीने वाळू उत्खनन केले जाते.मात्र तलाठी किरण सोनवणे हे गेली अनेक वर्षे अनधिकृत वाळू उत्खननास सहकार्य करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक ग्रामस्थांच्या येत होत्या. त्याचबरोबर सर्वसामान्य वाळू व्यवसायिकांना देखील ते त्रास देत होते. स्थानिक कर्मचाऱ्यांवर देखील ते अरेरावी करत होते. सोनवणे यांच्याविरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी असताना देखील त्यांची बदली केवळ वाळू पट्टा असलेल्या भागातच केली जात असल्याने याबाबत आमदार वैभव नाईक यांनी राज्य शासनाचे महसूल विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे तक्रार करून वाळू पट्टा नसलेल्या भागात किरण सोनवणे यांची बदली करण्यास सूचित केले होते.त्यानुसार किरण सोनवणे यांची गोठोस तलाठी सजा येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!