‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’
ब्युरो न्युज (मुंबई) : शरद पवार गटाला नवं नाव मिळालंय. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असं नवं नाव पवार गटाला मिळालंय. राज्यसभा निवडणुकीसाठी हे नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे नवीन पक्षासाठी तीन नावांचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही नावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवारांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये पहिलं नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असं देण्यात आलं होतं. तर ‘वटवृक्ष’ या चिन्हासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शिवसेनेच्या फुटीनंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचं नाव त्यांच्या पक्षाच्या नावात आहे तसं नवीन पक्षाचे नाव घेताना पक्षाच्या नावात शरद पवार नाव असावे यासाठी शरद पवार गटाचे अनेक नेते आग्रही होते. शरद पवारांच्या गटाने जी नावं निवडणूक आयोगाकडे दिली होती त्यात शरद पवार असं नाव असावं यावर एकमत होतं. यासाठी तीन नावांचा पर्यायावर विचार करण्यात आला. ‘राष्टवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’, राष्ट्रवादी शरद पवार’ आणि ‘शरद पवार स्वाभिमानी पक्ष’ अशा तीन नावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.. यपैकी ‘राष्टवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलं. निवडणूक आयोगाने या नावाला मान्यता दिली आहे.