काजू बी ला प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव द्या

कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : काजू बी ला प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. अशी मागणी शासनाकडे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी २०० रुपये प्रति किलो काजू दरासाठी शासनाकडे मागणी केली आहे व यासाठी आंदोलनही केले आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात काजू बी उत्पादन होते. मात्र आयात होणाऱ्या काजू बी या शेतमालावर शासनाने आयात कर कमी केल्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी ची आयात होते, त्याची किंमत प्रति किलो ७० ते ८० रुपये एवढी असते. त्यामुळे जिल्ह्यातील काजू बी चा दर कमी होतो व स्थानिक काजू बी उत्पादक शेतकऱ्यांच्या काजूला स्थानिक व्यापारी व प्रक्रिया करणारे उद्योजक हे शेतकऱ्यांकडून स्थानिक दराने काजू बी खरेदी करत आहेत.
सन २०२२- २३ या हंगामामध्ये ८० रुपये ते १०० रुपये या दराने शेतकऱ्यांना काजू बी विक्री करावी लागली आहे. तसेच सन २०२३- २४ च्या हंगामामध्ये काजू उत्पादित शेतकऱ्यांच्या काजू बिला निश्चित दराबाबत व येणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने कोकण कृषी विद्यापीठाने उत्पादित खर्चानुसार प्रति किलोला १२९ रुपये असा दर जाहीर केला आहे. तर स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार प्रति किलो १९३ रुपये एवढा काजू उत्पादनाचा खर्च आहे, त्याचप्रमाणे काजू उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी स्वरूपात काजू बी प्रति किलो २०० रुपये दर मिळावा अशी मागणी केली आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व वस्तुनिष्ठ स्थानिक स्थितीनुसार काजू बी ला प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा व शासनाकडून शेजारील गोवा राज्याप्रमाणे काजू बी उत्पादित शेतकऱ्यांना प्रति किलो अनुदान द्यावे. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!