ब्युरो न्युज (मुंबई) : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
“माझी पहिली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात होत आहे. पहिलाच दिवस असल्याने असं झालं. कालच राजीनामा दिल्याने स्विचओव्हर झालं. सर्वात आधी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे की, आमचे एकमेकांविषयी असलेले संबंध आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. गेल्या 38 वर्षाच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे. पंतप्रधान मोदी यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन या देशामध्ये चांगले काम करता आले पाहिजे. देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज प्रवेश करत आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले.