सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील एका गावातील दिव्यांग युवतीचा अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन तेथीलच एका इसमाने तिच्यावर अत्याचार केला, गर्भवती राहिलेल्या या युवतीचा एका महिला डॉक्टरने बेकायदेशीररित्या गर्भपात केलेला आहे. याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
दिव्यांग युवतीचा अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर एका इसमाने अत्याचार केल्याची तसेच कुडाळ तालुक्यातील एका महिला डॉक्टरने संबंधित युवतीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचे संबंधित अत्याचारित युवतीच्या तक्रारीतुन उघड झाले आहे. संबंधित महिला डॉक्टर यांनी गर्भपात करण्यापूर्वी कुडाळ पोलीस ठाणे तसेच संबंधित कार्यालयास माहिती देऊन व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून गर्भपात प्रक्रिया करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी तसे न करता बेकायदेशीररित्या गर्भपात प्रक्रिया पूर्ण केली आहे. याबाबत संबंधित अत्याचारित युवतीने कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी संबंधित गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर सुमारे ६० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.












