28 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
कोल्हापूर (प्रतिनिधी) : 14 फेब्रुवारी रोजी गुजरी इथल्या एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे 28 लाख 37 हजार रुपयांची रोकड देवकर पाणंद परिसरातून लंंपास केली होती. अवघ्या दहा दिवसांंत, या गुन्ह्याची पोलखोल करत जुना राजवाडा पोलिसांनी सहा तरुणांना ताब्यात घेतल. त्यांच्याकडून 24 लाखाची रोकड, गुन्हात वापरलेली एक चारचाकी, दोन दुचाकी आणि 5 मोबाईल संच असा सुमारे 28 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुजरी इथले सोने व्यापारी दादा नामदेव मेटकरी हे बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भेंडे गल्ली इथून पुईखडीकडे घरी चालले होते. यावेळी क्रशर चौक इथं 5 ते 6 जणांनी पाठलाग करून मारहाण करत मेटकरी यांच्याकडील 28 लाख 37 हजाराची रोकड लांबवली होती. या प्रकरणी मेटकरी यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांंत अज्ञांंता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकानं दहा दिवस अथक परिश्रम करून या दरोड्याची पोलखोल केली.
शिवाजी पेठेतील रोहित केसरकर आणि फुलेवाडी रिंगरोड इथल्या रणजित कोतेकर या दोघांनी 4 साथीदारांच्या मदतीनं या गुन्ह्याचा कट रचला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी पोलिसांनी रोहित केसरकर,रणजित कोतेकर यांच्यासह तुषार रसाळे(रा. मंगळवार पेठ), ओंकार शिंदे(रा.शिवाजी पेठ काळकाई गल्ली), सौरभ शिवशरण, स्वप्नील ढाकरे(रा.राजेंद्रनगर झोपडपट्टी) या 6 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांंच्याकडून 24 लाख 4 हजाराची रोकड, गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी, 2 दुचाकी असा सुमारे 28 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. संशयिताना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 27 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याची उकल पोलीस निरीक्षक संजीव झाडे,पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे,परशुराम गुजरे, सागर डोंगरे,सतीश बांबरे,प्रशांत घोलप,अमर पाटील,प्रशांत पांडव,गजानन गुरव,संदीप माने,योगेश गोसावी,गौरव शिंदे,उत्तम गुरव यांनी मिळून केली आहे.













