रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि संजिवनी हाॅस्पिटल कणकवली यांचा विशेष सहयोग
कणकवली (प्रतिनिधी) : असरोंडी गावचे सुपुत्र आणि फिनिक्स मॅनकाईंड फाऊंडेशनचे संस्थापक डाॅ.वासुदेव तांबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असरोंडी शाळा क्र.२ उत्तर विभाग येथे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिबीराचे उद्घाटक निवृत्त गटविकास अधिकारी सिने अभिनेते विजय चव्हाण, प्रमुख उपस्थितीत रोटरी मेडिकल कॅम्प डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डाॅ.विद्याधर तायशेटे, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल अध्यक्ष शंकर तथा रवी परब, संस्थेचे मुख्य विश्वस्त विलास परब, असरोंडी सरपंच अनंत पोईपकर, उपसरपंच आदित्य सावंत,अनिल सावंत, अंकुश तांबे,शाळा व्यवस्थापन अध्यक्षा आर्या परब, असरोंंडी हायस्कूल मुख्याध्यापक सुशांत पाटील सर,देवेंद्र राणे सर,अर्जुन परब, आदी मान्यवर विचारमंचावर होते.
उद्घाटन प्रसंगी विजय चव्हाण म्हणाले की, गावातील नागरिकांचे उत्तम आरोग्य राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक पाहायला वेळ नाही,अशावेळी आज अनेक सामाजिक संस्था समाजसेवेचे व्रत मानून गावागावात आरोग्य शिबीर आयोजित करून नागरिकांना आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करतात, म्हणून फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशनचे विशेष कौतुक वाटते. मुंबईस्थित असलेले या संस्थेचे कार्यकर्ते आपल्या गावाचे ऋण फेडता यावेत यासाठी फिनिक्स मॅॅनकाईंड अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. हे निश्चितच उल्लेखनीय कार्य आहे.असे प्रतिपादन श्री.चव्हाण यांनी केले.
यावेळी रोटरी क्लब मेडिकल कॅम्प, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डाॅ.विद्याधर तायशेटे यांनी संस्थेच्या आरोग्य शिबीराचे कौतुक करून प्रत्येकांनी आपले फिजिकल चेक अप करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. रोटरी क्लब ऑफ कणकवली अध्यक्ष रो.शंकर तथा रवी परब यांनीही महा आरोग्य शिबीराला शुभेच्छा दिल्या.
फिनिक्स मॅॅनकाईंड फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त विलास परब, सहसचिव लक्ष्मण जाधव, खजिनदार दत्ताराम सावंत, अरूण सावंत, सचिव देवेंद्र सावंत आणि विश्वस्त राजेश कदम यांनी आरोग्य शिबीराच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली होती.
महा आरोग्य शिबीरात तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते. सुप्रसिद्ध सर्जन डाॅ.विद्याधर तायशेटे, फिजिशिअन डाॅ.प्रशांत कोलते,स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ.अश्विनी नवरे, जनरल फिजिशियन डाॅ.प्रिती पावसकर, अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ.शरण चव्हाण या सर्व डाॅक्टरांनी विविध आजारांवर रुग्णांची मोफत तपासणी व त्यांना औषधोपचार दिलेत. नेत्र चिकित्सक डाॅ.मधुसुदन तावडे, डाॅ.आदिती तावडे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वितरीत केलेत. संजिवनी हाॅस्पिटल कणकवली लॅब मार्फत ब्लडप्रेशर, हिमोग्लोबीन, मधुमेह, ई.सी.जी. अशा इतर मोफत तपासण्याही करण्यात आल्या यावेळी संजिवनी हाॅस्पिटलचे लॅब असिस्टंट, नर्सेस, आणि विवेकानंद नेत्रालयाचे स्टाफ यांनीविशेष सहकार्य केले.
असरोंडी पंचक्रोशीतील असगणी, किर्लोस, सातरल,कासरल, शिरवंडे परिसरातील २०० हून अधिक रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. या शिबिराच्या आयोजनासाठी असरोंडी पंचक्रोशीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,आणि माजी विद्यार्थी संघातील सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण महा आरोग्य शिबीराचे सूत्रसंचालन राजेश कदम आणि प्रास्ताविक विलास परब,तर आभार लक्ष्मण जाधव आणि दत्ताराम सावंत यांनी मानले.












