नेरूर वनपाल राठोड लाचलुचपत च्या जाळ्यात ; 15 हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

कुडाळ (प्रतिनिधी) : तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठीचा परवाना देण्याकरिता एका लाकूड व्यावसायिकाकडून पंधरा हजार रु. ची लाच स्वीकारताना कुडाळ तालुक्यातील नेरुर तर्फ हवेली (नेरुर) येथील वनपाल अनिल हिरामन राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ २० पकडले. नेरुर वनपाल कार्यालयात सापळा रचून शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. राठोड याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

संबंधित तक्रारदार हे कुडाळ तालुक्यातील लाकूड व्यावसायिक आहेत. लाकूड वाहतुकीचा परवाना मिळावा, यासाठी त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी नेरुर वनपाल यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. हा परवाना देण्यासाठी तसेच लाकुडतोडीचे मिळून वीस हजार रु. च्या लाचेची मागणी वनपाल राठोड याने तक्रारदार यांच्याकडे केली होती. त्यानंतर तडजोडीअंती पंधरा हजार रु. स्वीकारण्याचे राठोड याने मान्य केले होते.

या प्रकरणी संबंधित लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (सिंधुदुर्ग) यांच्याकडे २९ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नेरुर वनपाल कार्यालय येथे सापळा रचला.

तक्रारदार यांच्याकडून वनपाल राठोड याला पंधरा हजार रु. देण्यात आले. त्याचवेळी या पथकाने राठोड याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे, सुधाकर सुराडकर, सिंधुदुर्गचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित पाटील, शिवाजी पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भार्गव फाले, हवालदार जनार्दन रेवंडकर, नीलेश परब, प्रथमेश पोतनीस, – रविकांत पालकर, कांचन प्रभू जितेंद्र पेडणेकर यांनी केली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. वनपाल राठोड याला ताब्यात घेतले. सायंकाळपर्यंत तपासकाम व या संदर्भात कार्यवाही सुरू होती. सायंकाळी उशिरा राठोड याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

error: Content is protected !!