आणि सापडलेली १० लाखांची दागिन्यांची बॅग ग्रामपंचायत कर्मचारी करतो मालकाच्या स्वाधीन
भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी प्रामाणिकपणाचे केले विशेष कौतुक
तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे ते नाडण प्रवासादरम्यान सुमारे ९ ते १० लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग सापडल्यानंतर ती प्रामाणिकपणे संबंधित मालकाच्या स्वाधीन करून देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद सुरेश पाळेकर यांनी माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला. विशेष म्हणजे हरवलेले दागिने हे पोलीस कर्मचाऱ्याचे होते. अर्थातच आजकालच्या जमान्यात जिथे ज्याला सापडला तो मालक अशी समाजाची धारणा आहे तीथे एका सर्वसामान्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दाखवलेला प्रामाणिकपणा आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा दाखला देऊन जातो. तर झाले असे की, नाडण ता. देवगड येथील उमेश दत्तात्रय घाडी, हे विजयदुर्ग पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. तळेरे ते नाडण असा प्रवास करत असताना त्यांची दागिने असलेली बॅग प्रवासादरम्यान हरवली. या बॅगेमध्ये अंदाजे ९ ते १० लाख रुपये किमतीचे दागिने असल्याने ती हरवल्याचे लक्षात आल्यानंतर घाडी यांच्यासाठी मोठी चिंता निर्माण झाली होती.
दरम्यान, पाळेकरवाडी ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद पाळेकर यांच्या निदर्शनास ही बॅग आली. बॅगेतील मौल्यवान वस्तूंची किंमत लक्षात घेऊन कोणताही मोह न बाळगता त्यांनी संबंधित मालकाचा शोध घेत बॅग त्यांच्याकडे सुरक्षितपणे परत केली. पाळेकर यांच्या या प्रामाणिकपणामुळे घाडी कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.
या प्रामाणिक आणि कौतुकास्पद कार्याबद्दल पाळेकरवाडीचे सरपंच उदय पाळेकर यांनी प्रसाद पाळेकर यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. तसेच भाजप पडेल मंडळ अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर यांनीही दूरध्वनीवरून प्रसाद पाळेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
आजच्या काळात लाखो रुपयांचे दागिने असलेली बॅग सापडल्यानंतरही त्याकडे कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता ती मालकाच्या स्वाधीन करणाऱ्या प्रसाद पाळेकर यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे ‘माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे’ याचा प्रत्यय आला आहे.












