आचरा (प्रतिनिधी) : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा राठिवडे नंबर.१ या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राठीवडे गावातील महिलांच्या सन्मानार्थ शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. महिला मेळाव्याचे उद्घाटन राठिवडे सरपंच दिव्या धुरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष धुरी व शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्नेहल धुरी व माजी जि. प. अध्यक्ष शोभा पांचाळ तसेच प्रमुख पाहुण्या आरती कांबळी व शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सांडव यांच्या उपस्थितीत पार पडला. प्राथमिक शिक्षणात माता पालकांचा सहभाग या विषयावर आरती कांबळी यांनी उपस्थित महिला पालकांचे उद्बोधन केले. माता पालकांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या पाल्याला कशाप्रकारे शिक्षण द्यावे याचे मार्गदर्शन श्रीमती कांबळी यांनी केले. चर्चात्मक चाललेल्या या कार्यक्रमात बहुतांश महिला पालकांनी आपला सहभाग नोंदवला.
महिला पालकांचा शाळेतील सहभाग वाढावा या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समिती राठिवडे नंबर 1 यांच्या सहकार्याने राठीवडे होम मिनिस्टर 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित माता पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व खेळात पालकांनी आपला सहभाग नोंदविला शेवटपर्यंत रंगतदार चाललेल्या या सोहळ्यात राठिवडे होम मिनिस्टर 2024 पदाच्या मानकरी ठरल्या त्या शांताबाई राठोड तर उपविजेत्या ठरल्या सानवी धुरी.दोन्ही स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.स्पर्धा आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळा धुरी यांनी सर्वांचे आभार मानले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक उत्तम तांबे, शितल धुरी, राजेश भिरवंडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. होम मिनिस्टर स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या श्रीमती शांताबाई राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “हा विजय माझा एकटीचा नसून समस्त महिला वर्गाचा आहे” असे म्हणाले.