निरवडे गावातील घटनेने चर्मकार समाजात संतापाची लाट
संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थाध्यक्ष संजय कदम यांनी कलेक्टर, सीईओ कडे केली तक्रार
कणकवली (प्रतिनिधी) : एकीकडे जातीवाचक उल्लेख करू नये असा आदेश राज्यशासन देत असतानाच दुसरीकडे शासकीय विकासकामांच्या फलकावर चक्क चांभारवाडी असा जातीवाचक उल्लेख केल्याचा संतापजनक प्रकार सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात घडला आहे. या घटनेवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्मकार संतापाची लाट उमटली असून समाजबांधव आक्रमक झाले आहेत. संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई चे राज्याध्यक्ष संजय उर्फ छोटू कदम यांनी निरवडे गावातील या घटनेची तक्रार निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निरवडे ग्रामपंचायत च्या वतीने 15 व्या वित्त आयोगातून बाईतवाडी ते रोहिदासवाडी चर्मकार वस्ती दरम्यान बंदिस्त गटाराचे काम सुरू आहे. शासकीय नियमानुसार ठेकेदाराने संबंधित कामाचा फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र या शासकीय कामाचा नामफलक लावताना त्यावर रोहिदासनगर असा न करता चांभारवाडी असा करण्यात आला आहे. जातीवाचक उल्लेख करून एक प्रकारे चर्मकार समाजाची अपमानकेला जात आहे. ही घटना सर्वप्रथम संघटनेच्या सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा प्रिया निरवडेकर यांनी राज्याध्यक्ष संजय कदम यांना सांगितली. त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जात कदम यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली असता नामफलकातून समाजाचा जातीवाचक उल्लेख आढळून आला.निरवडे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी आपली जबाबदारी झटकत सबंधित ठेकेदाराने सदर नामफलक लावल्याचे सांगितले. याबाबत सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधुनही त्यांनीही तात्काळ कार्यवाही केली नाही. अखेर या घटनेला आक्षेप घेत संजय कदम यांनी थेट जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा नामफलक बदलून लावावा अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा सनदशीर मार्गाने आवाज उठवणार असल्याचा इशाराही दिला आहे. यावेळी संस्थेचे राज्य खजिनदार रवींद्र पावसकर, माजी उपाध्यक्ष पंढरी जाधव, राज्य सहसचिव अमित चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सावंतवाडी महिला तालुकाप्रमुख प्रिया निरवडेकर, ,प्रशांत निरवडेकर आदी उपस्थित होते.


















