गावच्या अस्मितेचे, एकात्मतेचे दर्शन ! अबालवृद्ध-युवाईचा पारंपारिक वेशभूषेत सहभाग
एकता आणि विकासात गावचा प्रतिसाद या विराट उपक्रमातून स्पष्ट !
फोंडाघाट(प्रतिनिधी) : मराठी नववर्षाचा शुभारंभ आणि गुढीपाडव्याची श्रीखंड- पुरी तसेच अबाल वृद्धांसह दिवाळीचा जल्लोष फोंडाघाट संस्कृती कला मंच आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गोरज मुहूर्तावर एसटी स्टँड पासून मारुती मंदिर दरम्यान, शोभा यात्रेतून ओसंडून वाहत होता. सलग दहाव्या वर्षी शोभा यात्रेचा शुभारंभ फटाक्याच्या आतषबाजीत करण्यात आला. प्रथम नागरिक सौ संजना आग्रे यांनी कला मंचचे संस्थापक स्वर्गीय सचिन नारकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले आणि श्रीफळ वाढवले. यावेळी रंगखांब ग्रुप, कणकवली यांनी सादर केलेला गणेश वंदनाचा नाट्यविष्कार सर्वांना मंत्रमुग्ध करून दिला गेला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुंदर पारकर,संदीप नानचे यांनी केले..
या शोभायात्रेत उपसरपंच तन्वी मोदी, सेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे,बाळा वळंजू , राजन चीके,प्रसाद पारकर, आनंद मर्ये, गुणेश कोरगावकर,भाऊ वंजारी,सचिन तायशेटे, हेल्प अकॅडमी चे संजय नेरुरकर,बाळा माणगावकर, संस्कृती कला मंचचे सर्व सदस्य, वीरेश रेवडेकर, समीर भालेकर, एसटी कंट्रोलर राठोड, यांचे सह फोंडाघाट पंचक्रोशीतील अबालवृद्ध-युवाई- नागरिक पारंपारिक वेशात उत्साहात सहभागी झाले होते.
संस्कृती कला मंचने सलग दहा वर्ष फोंडाघाट मधील जनतेमधील एकता आणि अखंडता तसेच चांगल्या विकासात्मक गोष्टींना भरभरून प्रतिसाद दिल्याचे या विराट उपक्रमातून दिसून येत आहे.अशी भावना सरपंच सौ. संजना आग्रे यांनी व्यक्त केली. तर ढोल पथकाची प्रतिनिधी रसिका कुबडे यांनी कला मंच यांनी व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याबद्दल कौतुक केले. वर्षा चोरगे यांनी स्वर्गीय सचिन नारकर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम लोकाभिमुख आणि नवीन वर्षाची उत्साही सुरुवात यासाठी होत असल्याचे सांगितले. राधाकृष्ण महिला ढोल पथकाने कलात्मक ढोल वादन करून शोभायात्रेत ऊर्जा भरली. रंगखांब ग्रुप,कणकवली यांचा नृत्यविष्कार सर्वांची मने जिंकून घेत होता. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पारंपारिक फुगड्या शोभायात्रेचे महिलांचे आकर्षण ठरल्या.तर लोककलेतून महिलांचे समई नृत्य आणि वारकरी वेषा तील सांप्रदाय दिंडी शोभायात्रेचे पावित्र्य अधोरेखित करत होती. भगवे ध्वज घेतलेले शाळकरी आणि मधोमध वेशभूषा केलेला लक्ष्मण-राम -सीता – हनुमान रामलल्लाचा चित्ररथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. तर जयसिंग कोथमीरे यांचा वासुदेव लक्षणीय होता. कला मंचच्या शिवकन्यांनी धाडसी लाठीकाठी मर्दानी खेळाला उपस्थितानी दाद दिली.पारंपारिक लेझीम प्रकार शोभायात्रेचे आकर्षण ठरले. भरत मोरे यांचे वस्तुनिष्ठ निवेदन आणि गावातील युवकांचे सर्वतोपरी सहकार्य यामुळे नेहमी वाहतुकीचा खोळंबा कमी प्रमाणात होत होता. नियोजनबद्ध शोभायात्रा रात्री पर्यंत उदंड उत्साहात संपन्न झाली.

















