मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन पात नौका रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आचरा नजीकच्या समुद्रात दुर्घटना ग्रस्त होण्याची घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला तर एकाने पोहत येऊन पहाटे आचरा किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले. मयत झालेल्या तिघांमध्ये नौकामालक व सर्जेकोट सोसायटीचे व्हाईस चेअरमन, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम उर्फ जीजी आडकर यांच्यासह खलाशी प्रसाद भरत सुर्वे (वय ३२), लक्ष्मण शिवाजी सुर्वे (वय ६५) यांचा समावेश आहे. तर विजय अनंत धुरत (वय ५३, रा. मोर्वे देवगड) यांनी किनारा गाठण्यात यश मिळविल्याने ते बचावले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सर्जेकोट येथील गंगाराम उर्फ जीजी आडकर हे काल रविवारी रात्री आपली जनता जनार्दन या नावाची मच्छीमारी पात नौका घेऊन तीन खलाशांना घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. कुणकेश्वर येथील समुद्रात मासेमारी करून जाळी ओढल्यावर ते माघारी परत असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे नौका हेलकावे घेऊन पाणी भरू लागल्याने जीव वाचविण्यासाठी चौघानीही समुद्रात उड्या घेतल्या. आज पहाटे यातील विजय धुरत हे आचरा बंदर नजीकच्या समुद्रातून पोहत किनाऱ्यावर येत हिर्लेवाडी येथील पेडणेकर यांच्या घरी गेले. त्यांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे दाखल केले तर अन्य तिघंचा मृतदेह सोमवारी सकाळी वायंगणी किनाऱ्यावर तिन्ही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडून आले. हे मृतदेह आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर पोहत आलेल्या विजय धुरत यांच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. यावेळी आचरा पोलीस निरीक्षक पी. ए. पोवार, हवालदार तांबे, हवालदार पुजारे, हवालदार परब, कॉस्टेबल वैजल, सरपंच जेरॉन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी आदी उपस्थित होते. यावेळी डीवायएसपी आणि मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही भेट देत पाहणी केली.
या दुर्घटनेमुळे ऐन नारळी पौर्णिमेला सर्जेकोट, हडी गावावर शोककळा पसरली आहे.












