ब्यूरो न्यूज (मुंबई) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जाहीर माफी मागितल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीने आज जोडे मारो आंदोलन होत आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगीची वाट न पाहता आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढून जाहीर सभा घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, महायुतीकडून महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे.
या मोर्चासाठी राज्यभरातील महाविकास आघाडीचे नेते हुतात्मा चौकामध्ये पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते हुतात्मा चौकातून गेट वे ऑफ इंडियाकडे मार्गस्थ झाले आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत. यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवद्रोह्यांना माफी नाही अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीला (एमव्हीए) आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. यानंतरही विरोधक मोर्चे काढत आहेत. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटकांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.