उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न

साहित्याचे प्रयोजन माणसाला सुसंस्कृत करते, नीतिमत्ता शिकवते – डॉ. भालचंद्र मुणगेकर

मुंबई (ब्युरो न्यूज) : आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा वंदना प्रकाशन व महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, वा. वा. गोखले सभागृह माहीम येथे संपन्न झाला.
त्यावेळी समारंभाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी संसद सदस्य व माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ आणि समारंभाचे प्रमुख पाहुणे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, जागतिक साहित्याचे अभ्यासक राजीव श्रीखंडे, तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनील सावंत, सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. रमेश कोटस्थाने, हिंदी साहित्यिक डॉ. बीरेंद्र प्रताप सिंह आणि ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुनीळ सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि सोहळ्याची सुरुवात झाली. ‘विनम्र भावे हे गीत स्वागताचे’ या गीताने सूत्र संचालिका पूजा काळे यांनी उपस्थित साहित्यिकांचे स्वागत केले.

वंदना प्रकाशन संस्थेचे संस्थापक साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यात ते म्हणाले की वंदना प्रकाशन, मुंबई या संस्थेची १९८६ सालात नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी स्थापना केली. अनेक दर्जेदार पुस्तकांना शासनाचे किंवा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त होत नाहीत. अशा पुस्तकांना ही पुरस्कार लाभावेत, या हेतूने १९९८ सालापासून उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कार देण्यास सुरूवात केली. ह्या स्पर्धेसाठी दर्जेदार प्रकाशन संस्थांनी पुस्तके पाठवून स्पर्धेला व आशीर्वाद पुरस्काराला श्रीमंत व मौल्यवान बनवले. गुणवंत साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा गौरव झाला पाहिजे.असा शोध घेता आला पाहिजे. साहित्यिक समाजाचे प्रतिनिधित्व करतात.त्यामुळे त्यांनी सामाजिक नीती मूल्यांची जाणीव ठेवावी तरच समाजात त्यांना मान मिळतो.

त्यानंतर जागतिक साहित्याचे अभ्यासक राजीव श्रीखंडे यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी प्रतिपादन केले की कलेच्या प्रांतात काळ कितीही कमी असला तरी निर्मिती मागे खूप मोठी साधना असते. मानवी जीवन समृद्ध करण्यात साहित्याचा जनमानसावर मोठा प्रभाव पडतो. अनेक जागतिक लेखकांनी लिहिलेल्या वास्तवाचा परिणाम समाजावर झाला आहे. हुकूमशाहीचा अभ्यास केला तर विविध लेखकांनी लिहिलेला इतिहास खरा होता. भविष्य सूचक साहित्य लिहिणे व सर्व कलांचा, आस्वाद घेणे ही योग्य संस्कृती होय. त्या त्या काळातल्या लेखकांचे उल्लेखनीय साहित्य ही समाजमनाची शक्ती असते. आपल्या भाषणात राजीव श्रीखंडे यांनी डॉ. सुनील सावंत यांच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने गौरव उद्गार काढले. ते म्हणाले की सूर्य दिसत राहील तोपर्यंत या काव्यसंग्रहामध्ये अनेक वैविध्यपूर्ण कविता आहेत. सामाजिक बांधिलकी ही प्रांतापुरती मर्यादित नाही. कल्पना, प्रतिमा, व्यक्त होण्यामध्ये विविधता आहे. उपदेश करण्याची थोडीशी पद्धत आहे. पण त्यांची आतून तळमळ असल्यामुळे ती त्यांच्या काव्यात दिसून येते. वाचकांनी त्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा. आशीर्वाद पुरस्कार मराठी व इंग्लिश पुस्तके निवडीचे अध्यक्ष रमेश कोटस्थाने यांचे पुरस्कार निवडीचे पत्र त्यांची मुलगी कृष्णा मेंडोंसा हिने वाचून दाखवले. सुनील सावंत यांच्या बद्दल अनेक आठवणी सांगितल्या आणि साहित्यिक गुणवत्तेशी तडजोड न करता पुरस्काराची निवड केली हे प्रांजळपणे कबूल केले.

आशीर्वाद पुरस्कार हिंदी पुस्तके निवडीचे अध्यक्ष बीरेंद्र प्रताप सिंह आपल्या भाषणात म्हणाले की हर लेखक में एक आग सुलगती है!ती आग त्याला स्वस्थ बसू देत नाही. तेव्हा तो लिहितो. समाज यदी आत्मा है तो साहित्य उसका शरीर है ! साहित्य समाजाचा आरसा असतो. समाजाला मार्ग दाखवणारा दीपक असतो. साहित्यकाराला जो योग्य सन्मान मिळाला हवा तो मिळतो का? त्या नवलेखकांना नवसाहित्यांना स्थान देतात का? असा एक प्रश्न त्यांनी समाजासमोर ठेवला.

त्यानंतर समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या समय सूचक भाषणात सांगितले की सातव्या वेतन आयोगाचा आनंद कसा असू शकेल तसा हा साहित्याचा आनंद घेणारी मंडळी इथे हजर आहेत. माणसाच्या आवाजावरून त्याचा स्वभाव सहज कळून येतो. सावंतांच्या फोनवरून त्यांचा स्वभाव सांगताना रमेश कोटस्थाने यांच्या घरात हसरे तारे या नाटकाचा उल्लेख केला. रमेश कोटस्थाने यांनी आपल्या मुलीकडे बघून हे नाटक लिहिले असावे असे मला वाटते. बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई इत्यादी नाटकांवरून त्या त्या व्यक्तीचा स्वभाव घरी असाच असतो का असा मला प्रश्न पडला.अशी मिश्किल टिपणी करत सरांनी वातावरण हलकं -फुलकं करण्याचा प्रयत्न केला. पुरस्कारासाठी मधला दहा वर्षाचा कालखंड त्यांनी सोडला नाही. कोरोना काळामध्ये अनेक संस्थांनी आपापले पुरस्कार बंद केले ते कायमचे. राजसत्ता आणि साहित्यिक  यांचा अही नकुलाचं नातं आहे, हे कसं आहे ह्या बद्दल शंका घ्यायला वाव असतो. सहसा पटत नाही. यादव राज्यात कवी नरेंद्र राजकवी होते. रुक्मिणी स्वयंवरसाठी राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा त्यांनी नाकारल्या. आमच्या कवी कुळाला कलंक  लागेल अशी त्यांची भावना होती. साहित्य हे विकलं जात नाही. त्याने राजा प्रभावित झाला. आमच्या महानुभव सांकेतिक लिपीत गेलेलं साहित्य हे  संचित होतं. महत्त्वाच्या साहित्यावर गदा येणे शक्य असतं. साहित्याच्या पाठीमागे उभी राहणारी माध्यम संपली आहेत. साहित्य विषयी माणसं उदासीन होतात तेव्हा समाजातील निष्ठा लयास जातात. लेखकाची कलाकृती वाचल्यावर माणसं का पेटून उठत नाहीत? दया पवारांचे दलित साहित्य ओळखले गेले तेव्हा साहित्याच्या पाठीशी उभी राहणारी आज माणसं नाहीत.मासिक नाहीत. समाजाची वास्तवता दाखवणे हे काम लेखकांचे असते. पण मुखवट्यावरचे परीक्षण असते. पुस्तके भरपूर लिहिली जातात, पण जागा नाही म्हणून पुस्तकाची चर्चा होत नाही. पुस्तकाचं परीक्षण डिटेल मध्ये येत नाही. मेडिकल क्षेत्रातील घडणारे वास्तव तर सत्य वेगळे आहे. तत्वनिष्ठ लेखक साहित्याबद्दल उदासीन होतात. तेव्हा आजचा लेखक चौकस आहे का? अनेक पुस्तकांना साहित्य पुरस्कार मिळतात. त्यात वाईट पुस्तकांना सुध्दा दर्जेदार संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.चार पाने वाचल्यानंतर चांगलं पुस्तक काय आहे हे सहज समजून येतं. तटस्थपणे पुस्तक परीक्षण करणे आणि लेखकांच्या मागे उभे राहण्याची वंदना प्रकाशनची प्रवृत्ती डॉ. सुनील सावंतानी स्वीकारली आहे. आकाशातल्या तेजस्वी ताऱ्याचा शोध घेऊन त्यांनी हे पुरस्कार दिले आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढं  थोडंच आपण बोलत राहिलो, तर अनेक गोष्टी बोलता येतील. 

त्यानंतर समारंभातील प्रमुख वक्ते ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनीळ सामंत म्हणाले की मला बोलण्याची सक्ती आहे. आपण अपघाताने याकडे कसे आलो हे त्यांनी नमूद केलं. पुस्तक काढणं सोपं असतं.पण पुस्तकाची विक्री करणं खूप अवघड आहे.कुमार केतकर यांनी या व्यासपीठाची कल्पना दिली. ई साहित्य निर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगितली. 15 मिनिटात एक लाख लोकांकडे पुस्तकं जात. ई साहित्याला पर्याय नाही. सैनिक, मेंढपाळ, शेतकरी याचा उपयोग कसा करतात. त्याबद्दल सविस्तर सांगितले. यामधून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे, याचा प्रसार वेगाने होत आहे.वंदना प्रकाशनचे सुनील सावंत हे या ई साहित्य प्रकाराला पुरस्कार देणारे पहिलेच साहित्यिक आहेत.

त्यानंतर समारंभाचे अध्यक्ष भालचंद्र मुणगेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सूत्र संचालिका पूजा काळे यांचे विशेष कौतुक केले. मी साहित्यावर घडलो मी खरा अर्थतज्ञ. विचारवंत नाही. सामान्यातल्या सामान्य वाचक म्हणून बोलतो. कुलगुरूपदी असताना अनेक कामांचे व्याप असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असत. परंतु व्यक्तिगत आयुष्यावर साहित्याचा खूप प्रभाव पडलेला आहे. साहित्यामुळे मी घडलो सुगरणीचे घरट बांधणे एका चोचीवर असतं. पण माणसाला दहा बोटं असतात त्या दहाही बोटाने काम करण्याचे प्रात्यक्षिक म्हणजे सुनील सावंत. स्वतःसाठी सगळेच जगतात. दुसऱ्यासाठी जगणं हे मेणबत्ती प्रमाणे आहे. मराठी वाचक चोखंदळ आहे.मराठी कार्यक्रमासाठीआज साडे तीन वाजता जमलेले शेकडो लेखक व रसिक पाहून मराठी भाषेच्या भवितव्याविषयी काळजी वाटण्याचे कारण नाही. साहित्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. हल्ली माणसं एकत्र येणं कठीण झालंय. पत्र वाचण्याची आतुरता उत्सुकता राहत नाही. मराठी माणसाच्या मनात आजही खांडेकरांना स्थान आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर मी घडलो.मी साहित्याचं अपत्य आहे.सामाजिक भावना तीन शब्दात त्यांनी संगितल्या.शब्द अश्रू आणि रक्त. मी सर्वस्व दान करीन पण अश्रू दान करणार नाही. लोकांच्या सुप्त मनातील भावनांचा एकत्रित अविष्कार म्हणजे संस्कृती. समाजातील प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या उंचीवर ठरते. आजही सातबारे पुरुषाच्या नावावर आहेत.साहित्याचे प्रयोजन माणसाला सुसंस्कृत करते, नीतिमत्ता शिकवते, चांगलं वाईट सांगते. तेच समजण्याचं मोजमाप असते. साहित्यात प्रेमचंद आणि रवींद्रनाथ टागोर यांचा भारतीय ललित साहित्याचा प्रभाव आहे. मी माझ्या श्वासा इतकं मराठी संस्कृतीवर मराठी भाषेवर प्रेम करतो. साहित्याच्या विविध प्रकारातून लेखक विचारवंत साहित्यिक समाजाला प्रगल्भ करू शकतात. समाज बदलण्याची ताकद साहित्यात असून साहित्यक्षेत्रात अशी लेखकांची क्षमता हवी की त्यांचा मान हा शासन दरबारी व्हायला हवा. आज शासन आपलं जगणं ठरवत असते.

एकूणच रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार महाराष्ट्रातील मराठी ५७, ई बुक मराठी १०, हिंदी १३ व इंग्लिश ३ साहित्यिकांना देऊन सन्माननीत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देशातून व परदेशातून आलेले अनेक साहित्यिक हजर होते. तसेच लेखनाला वय नसतं ही ऊर्जा वयाच्या ८१ ते ९५ वर्षी सुद्धा असते हे लेखकांनी व्यासपीठावर पारितोषिक घेऊन दाखवून दिले. आशीर्वाद पुरस्कार स्वीकारण्यासाठी ९५ वर्षाच्या लेखिका संगीता जोशी ह्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्या. निवेदिका पूजा काळे यांनी प्रसंगानुरूप आपल्या सुस्पष्ट मधुर वाणीने सभागृहातील वातावरण चैतन्यमय ठेवले. योग्य प्रसंगी काव्यमय सुसुत्रता ठेऊन कार्यक्रम पुढे नेण्याचे कसब साधले. सर्व रसिक प्रेक्षक लेखक मान्यवर मंडळींना चहा अल्पोपहार देण्यात आला.
त्यानंतर आभार प्रदर्शन डॉ सुनील सावंत यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप झाला. समारंभास शेकडो साहित्यिक व रसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!