बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरातून फुगड्या- आरती आणि भजनांच्या उत्साही स्वरांनी वातावरण मंगलमय !

फोंडाघाट मध्ये श्री कुळदेव प्रासा. भजन मंडळाची सर्वत्र धूम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर सुग्रास मोदकावर ताव मारून सुखावलेल्या घरोघरी, मंगलमय वातावरण पसरले आहे. घराघरातून सकाळ- दुपार- रात्री बाप्पाच्या यथासांग पूजेनंतर, विविध धूप- अगरबत्ती- फुलांचा सुगंध लांब पर्यंत पसरल्याने वाड्यावाड्या दरवळल्या आहेत. घरे- माणसे, चाकरमानी, मुलेबाळे, नातवंडे आणि माहेरवासिनींनी ओसंडल्याने त्यांचाही किलबिलाट भर घालत आहे. टाळ- मृदुंग- घुंगुरवाळ्यांचा आवाज उत्साह वाढवत आहे. संध्याकाळी गावातील वाडी- वाडी वरील भजनांचे मेळे, त्यांच्या सुपाऱ्या आधीच नक्की झाल्याने, लगबग- उत्साह दिसून येत आहे.काही घरातून येणारे घागर फुंकल्याचे आणि पारंपारिक फुगड्यांचे हुंकार लक्ष वेधून घेत आहेत. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या आरत्या आणि वाटला जाणारा प्रसाद यावर तरुणाई फिदा आहे.

रात्री उशिरापर्यंत वाड्या- वाड्यावरील बुवांचे खड्या आवाजातले आरोह, चढ- उतार, पारंपारिक बापाची आरती- आळवणी,गण, गवळण, गजर इत्यादी आसमंत मंतरलेला अन भक्ती पूर्ण झाला आहे. गावातील प्रत्येक नामवंत अन नवोदित भजन मंडळामध्ये फोंडाघाट- कुळाची वाडी येथील श्री कुळदेव प्रासादिक भजन मंडळाची सर्वत्र धूम असून, पुढील अकरा दिवस संपूर्ण रात्री ते व्यस्त आहेत. मंडळाची धुरा बुवा संजय लाड, सहदेव आप्पा लाड हे सांभाळत असून पखवाज धाकु मेस्त्री, व चक्की मृणाल लाड यांचे वादन लक्षणीय ठरत आहे. त्यांना आप्पा लाड,अरुण- अरविंद-भार्गव- मंगेश- दिनेश- रोहन- नामदेव- सौरभ लाडज्ञाती बांधव साथ देत आहेत. भजनाची सुरुवात गणेश वंदनाने झाल्यावर “हात ना पसरले त्यांनी | शासनापुढे झुकविली मान | साहेब कोटी कोटी प्रणाम | भगव्यासाठी लाविले पणाला प्राण ||” यासारखा गण तर “आयुष्य मोजावया बैसला मापारी | तू का रे व्यवहारी — संसाराच्या ?” अशी वस्तुनिष्ठ मनमोहक पदे,तर बाप्पाच्या जय जय कारा चा गजर,भजन प्रेमींचे आपसूक लक्ष वेधून घेत आहे. घराघरातून आळवली जाणारी ही भक्तीपदे अन त्यानंतर उसळपाव, वडापाव, कांदापोहे अशा लोकप्रिय प्रसादाने या पुढील काही रात्री उदंड उत्साहात संपन्न होणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!