ऊन -पावसाची संततधार, चाकरमान्यांचे आगमन, बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी, वाहनांची कोंडी ,व्यापाऱ्यांची प्रतीक्षा, तरीही सर्वांना बाप्पाची ओढ
फोंडाघाट(प्रतिनिधी) : कोकणात चार दिवसांनी जेष्ठा गौरीचे आवाहन आणि आगमन होत असले तरी, काही घरांमध्ये गणपतीच्या आगमना बरोबरच ” गौराई “चे, आवाहन विहिरीवरून वाजत गाजत माहेरवाशिणी यांच्या हस्ते केले जाते. आणि गणपती प्रतिष्ठापनेनंतर गौराईला मुखवटा- दागदागिन्यांनी सजवून तिची प्रतिष्ठापना- पूजा केली जाते.हा मान माहेरवाशींचा असल्याने घरामध्ये उत्साह ओसंडुन वाहत असतो.
हरतालिका पूजनाने प्रतिवर्षाच्या गणेशोत्सवाची सुरुवात पारंपारिक पद्धतीने घरोघरी करण्यात आली. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मनाजोगा पती मिळावा म्हणून, कुमारिकांनी विशेषतः कोकणात, गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर वाडी वरील एका घरामध्ये हरतालिका पूजनाचा मांड वर्षानुवर्ष केला जातो. गुरुजींच्या पौरोहत्त्याखाली, हरतालिकेच्या प्रतिनिचे पूजन केले जाते. वाडी-वाडी वरील सुहासिनी- कुमारीका निर्जळी उपवास करून, मांडावर जात, हरतालिकेचे यथासांग पूजन करतात. ओटी भरतात.आणि फळफळांचे वाण एकमेकींना देत, पारंपारिक गाणी, फुगडी इत्यादी मनोरंजनात्मक खेळ खेळत, सण उत्साहाने साजरा करतात. फोंडाघाट मधील वाडीवर मांड असलेल्या ठिकाणी, हरतालिका पूजन चा उत्साह ओसंडून वाहत होता.
दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी ! प्रत्येक रंग शाळेतून गणपती घरोघरी नेण्याची लगबग सुरू होती. सध्याचे पावसाळी दिवस पाहता, मिळेल त्या चार चाकी किंवा माणसांकडून बाप्पा चे एक दिवस आधी आगमन झाले. चतुर्थी दिवशी सकाळी पुरोहित उपलब्धतेनुसार दुपारपर्यंत घरोघरी विघ्नेश्वराची प्रतिष्ठापना मोठ्या भक्ती भावाने उदंड उत्साहात आणि फटाकाच्या आतषबाजीत करण्यात आली. मृदंग-टाळ- आरत्यांचा मधुर स्वरांनी वाड्या झंकारू लागल्या. सुश्राव्य भजनांनी रात्री जागवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे गेले दोन दिवस चाकरमान्यांचे आगमन- बाजारपेठेतील गर्दी- वाहतूक कोंडी- आणि ग्राहकांच्या प्रतीक्षेतील व्यापारी यांची अनिश्चितता नाहीशी झाली. पुढील काही दिवस वाड्या- वाड्या, गाव- गाव आणि घरे उत्साहाने, आनंदाने, चिंतामुक्तीने ,विविध प्रकारच्या प्रसादाच्या घमघमाटाने मंतरलेली असणार ? यात शंका नाही.