विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह एकता आणि सहभागात युवाई आघाडीवर ! गावाच्या विकासात सुद्धा निरपेक्ष, अग्रेसर व्हावे ही तो श्रीं ची इच्छा
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग आठव्या वर्षी, फोंडाघाटच्या गणेश तरुण मंडळातर्फे, चतुर्थीच्या पूर्वसंध्येवर, एसटी स्टँड समोर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तिकार सदानंद हिंदळेकर यांच्या पाचोबा कडील रंगशाळेतून “फोंडाघाट राजा” चे मोठ्या दिमाखात ढोलताशांच्या अन् गणेशाच्या जयजयकारात,फटाक्यांच्या आतशबाजी त सभामंडप स्थळी आनंदी वातावरणात आगमन झाले. “फोंडाघाटच्या राजा “ची त्याच्या सभा मंडपात शनिवारी सकाळी, पूजाअर्चा आरती, तीर्थप्रसाद सह प्रतिष्ठापना करण्यात आली.सभा मंडपाची दिमाखदार सजावट आर्टिस्ट गौरव भोगटे आणि सहकाऱ्यांनी लक्षणीय केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त रोज सकाळी पूजा-अर्चा दुपारी, संध्याकाळी महाआरती आणि विविध धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपारिक भजनांचे कार्यक्रम आयोजित केले आहे. यामध्ये रविवार आठ रोजी रवळनाथ भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन ,सोमवार तारीख ९ रोजी वारकरी भजन, मंगळवार तारीख १० रोजी चित्रकला स्पर्धा, बुधवार तारीख ११ रोजी खुल्या रेकॉर्ड स्पर्धा, गुरुवारी लकी ड्रॉ सोडत यासह स्थानिक भजनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शुक्रवार तारीख १३ रोजी सायंकाळी सिंधू गर्जना ढोल पथकाच्या गर्जनेत राजाचा दिमाखदार विसर्जन सोहळा आयोजित केला आहे. असा तारीख ६ ते १३ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव उदंड उत्साहात साजरा होणार आहे.
सर्वांनी एकत्र येऊन, विशेषतः नव्या पिढीने आपल्या परंपरा-संस्कार पुढच्या पिढीला प्रदान करावेत, तसेच त्यातून गावाच्या विकासाचे मंथन व्हावे या दृष्टिकोनातून हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता. आता गावाच्या विकासात पुन्हा एकदा युवाईने निरपेक्ष, अग्रेसर व्हावे ही तो श्रीं ची इच्छा– त्यास पंचक्रोशीतील सर्वांनी साथ द्यावी.अशी अपेक्षा संदेश पटेल यांनी व्यक्त केली. या सोहळ्यात पंचक्रोशीतील सर्वांनी सहभागी होऊन फोंडाघाटच्या राजाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन अध्यक्ष राज सावंत, उपाध्यक्ष गौरव भोगटे, सचिव पुष्पक नाईक, खजिनदार सागर वाळवे, आणि समस्त सहकारी नवीन पडेलकर, निनाद पारकर,रणजीत बांदिवडेकर, सौरभ सुतार,प्रतीक परुळेकर, ओंकार पवार या सहकार्यांनी केले आहे.