असुविधा असूनही विसर्जन सोहळा उदंड उत्साहात साजरा
अनंत चतुर्दशी पर्यंत हेळेवाडी गणपती सान्याचे टिकाऊ काम युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गौरी – गणपतीचे विसर्जनाचे वेळी, फोंडाघाट- हेळेवाडी येथील ग्रामस्थांना, ठेकेदाराच्या वेळ काढू धोरणामुळे असुविधांचा सामना करत, विसर्जन करावे लागले. यावेळी शासनाने वाडी वाडीवर सुविधा निर्माण करण्यासाठी, गणपती विसर्जन सान्या चे टेंडर स्थानिक ठेकेदाराला देवुन ही निकृष्ट, कुर्मगती बांधकाम आणि वेळकाढूपणामुळे तसेच स्थानिकांना विश्वासात न घेतल्यामुळे निर्माण झालेल्या त्रासाबद्दल,विसर्जन स्थळी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. तरीही अगोदर एक दिवस स्थानिकांनी सान्यावरील गवत साफ केले. तर ठेकेदारांनी केलेल्या चिऱ्याच्या बांधकामाखालील माती पाण्याने वाहून गेल्याने, ती साफ करून विसर्जन साना स्वच्छ केला. त्यामुळे उदंड उत्साहात भजने आणि आरत्यांच्या सुस्वारात भाविकांनी गौरी- गणपतीला ” पुढच्या वर्षी लवकर याss ” च्या उद्घोषात साश्रू पूर्ण नयनांनी निरोप दिला.
फोंडाघाट हेळेवाडी गणपती सान्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने, सजग ग्रामस्थांनी सदर कामावर हरकत घेऊन काम स्थगित करण्यास भाग पाडले त्यानंतर तारीख १-०७-२४ रोजी चतुर्थी जवळ येत असल्याने, सदर काम टेंडर प्रमाणे, सक्षम अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या देखरेखीखाली टिकाऊ करून देण्याचे पत्र ग्रामस्थांनी सरपंच यांना दिले.मात्र गौर- गणपती विसर्जनापर्यंत पावसाळा खूप असल्याचे तकलादु कारण देत ठेकेदारांनी वेळकाढूपणा केल्यामुळे, भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.याबद्दल जमलेल्या भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. यावेळी ग्रामस्थांमधून गजानन नानचे आणि मुंबई स्थित अभियंता सुनील वाळवे यांनी, झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आता पावसाळा कमी झाल्यामुळे टिकाऊ बांधकाम ठेकेदाराने त्वरित करून द्यावे. म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत भाविकांना असुविधा अथवा त्रास होणार नाही. अथवा दुसऱ्या ठेकेदाराकडून उर्वरित काम तातडीने करून द्यावे. अशी आग्रही मागणी ग्रामस्थ व भाविकांनी सरपंच व संबंधित अधिकारी यांचे कडे केले आहे. यादरम्यान ठेकेदार हा ग्रामस्थ- तक्रारदार यांच्यामध्ये राजकारण करून तेढ निर्माण करीत असल्याचा आरोपही करण्यात आला. याबाबत तातडीने तोडगा न काढल्यास स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.












