ओरोस (प्रतिनिधी) : भारतीय डाक विभागातर्फे या वर्षी ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात ७ ऑक्टोबर रोजी टपाल व पार्सल दिवस साजरा करून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. तर ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा डाक अधीक्षक मयुरेश कोले यांनी दिली. या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना त बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करून जास्तीत जास्त प्रचार व प्रसार डाक विभागातर्फे केला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
टपाल सप्ताहाच्या निमित्ताने माहिती देण्यासाठी जिल्हा डाक अधीक्षक कोले यांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा डाक कार्यालयातील आपल्या दालनात सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सहाय्यक अधीक्षक प्रताप मळीक, विपणन अधिकारी बालाजी मुंडे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अधीक्षक कोले यांनी, या वर्षीच्या जागतिक टपाल दिनाची थीम “संप्रेषण सक्षमीकरण व राष्ट्रातील लोकांच्या सशक्तिकरणाची 150 वर्षे” अशी आहे. या अंतर्गत बदलत्या डिजिटल युगातील भारतीय टपाल विभागाची नवीन भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न डाक विभागामार्फत केला जाणार आहे. या वर्षीचा डाक सप्ताর अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. यात सिंधुदुर्ग विभागामार्फत डाक सामुदायिक विकास कार्यक्रम अंतर्गत पोस्टाच्या सर्व सेवा व सुविधा एकाच दिवशी, एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष टाक मेळावा’ याचे आयोजन जिल्ह्यातील निवडक 12 गावांमध्ये केले जाणार आहे. तसेच डाक विभागामार्फत ग्रामीण भागातील लोकांना आधार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आधार अद्यतन व नुतनीकरण सेवा आधार कॅम्पच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग पूर्णपणे सज्ज आहे.
त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी टपाल व पार्सल दिवस, ८ ऑक्टोबर रोजी फिलॅटेली दिवस, ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिवस, १० ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस व ११ ऑक्टोबर रोजी वित्तीय सशक्तीकरण दिवस साजरा केला जाणार आहे. मागील काही वर्षात अनेक नवनवीन योजना डाक विभागामार्फत राबविल्या जात आहेत. यात बचत बँक, डाक जीवन वीमा योजनांचे संगणकीकरण, इंडीया पोस्ट पेमेंट बँक, आधार सेवा, कॉमन सर्व्हिस सेंटर, महिला सन्मान योजना, आधार इनेबल पेमेंट सर्व्हिस अशा विविध योजना व सुविधा नव्याने राबविल्या जात आहेत. सोबतच ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसच्या सेवा अधिक सुलभ करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 316 ग्रामीण टपाल कार्यालये संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहेत, असे सांगितले.
एकेकाळी मनी ऑर्डरचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्याची बहुतांश अर्थव्यवस्था पोस्ट खाल्यावर अवलंबून होती. कालांतराने यात बरेच बदल झाले असले तरी आजही जिल्ह्यातील नागरिकांना डाक विभागाबद्दल असलेली आपुलकी व विश्वासाहर्ता पोस्ट खाते आजही टिकवून आहे. नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात पोस्ट खात्यामार्फत 25 हजार पेक्षा अधिक बेसिक सेविंग खाते शून्य रुपयांमध्ये उघडून दिले आहेत. या खात्यांमध्ये लाडकी बहिण योजनेचे हप्ते देखील जमा झाले आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग डाक विभागाचे अधिक्षक मयुरेश कोले यांनी दिली, तसेच डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा व राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन सुद्धा केले आहे.












