गव्यसिद्ध महेश संसारे
वैभववाडी (प्रतीनिधी) : भारतीय संस्कृती, शाश्वत नैसर्गिक शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा मूळ आधार देशी गाय आहे. देशी गायीचे संगोपन ही काळाची गरज असून, ती भारतीय कृषी संस्कृतीचा कणा आहे, असे प्रतिपादन गव्यसिद्ध महेश संसारे यांनी केले.
जिल्हा परिषद केंद्र शाळा, हेत येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संसारे यांनी देशी गायीचे नैसर्गिक शेतीतील महत्त्व, दुग्ध व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ तसेच पंचगव्याच्या विविध उपयोगांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
रासायनिक खतांचा अतिवापर टाळून देशी गायीचे शेण व गोमूत्र यांचा वापर करून नैसर्गिक शेती करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यासह शेतीवरील खर्च कमी करण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र या पंचगव्य घटकांपासून विविध उत्पादने तयार करता येतात. देशी गायीच्या संगोपनामुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यासही हातभार लागतो, याकडे त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भानुदास बुराण, माजी अध्यक्ष देवानंद फोंडके, मुख्याध्यापक संतोष मोरे, उपशिक्षक हनुमंत गिते, प्रकाश फोंडके, श्रीमती कांबळे आदी उपस्थित होते.












