कुडाळ आणि कणकवलीत कारवाई
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणात मिठाई आणि फराळाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असतानाच अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवित संशयास्पद अन्नसाठ्यावर कारवाई केली आहे. या मोहिमेत तब्बल ४३ हजार ५८५ रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. यात कुडाळमधील ९८ किलो मावा, तर कणकवलीतील खवा आणि फराळाच्या साठ्याचा समावेश आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण १३ तपासण्या करण्यात आल्या. यावेळी मिठाई, मावा, खवा आणि फराळाच्या पदार्थांचे एकूण १७ नमुने संकलित करून तपासणीसाठी घेण्यात आले.
या कारवाईत कुडाळ येथे तब्बल ९८ किलो मावा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ३९ हजार २०० रुपये आहे. कणकवली येथे ६ किलो खवा, किंमत २ हजार १४५ रुपये, तसेच ३ किलो पोहा चिवडा आणि ५ किलो शेव चिवडा असा एकूण ८ किलो फराळाचा साठा, किंमत २ हजार २४० रुपये, जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण १०२ किलो अन्नपदार्थांचा साठा प्रशासनाच्या कारवाईत जप्त झाला आहे.
मोहिमेदरम्यान मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, खवा-मावा, विविध प्रकारच्या मिठाई आणि फरसाण यांचे नमुने घेण्यात आले. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणी अहवालाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधित विक्रेते आणि उत्पादकांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग यांनी दिली.
मिठाई-फराळ खरेदी करताना सावधान !
दिवाळीच्या आनंदात आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी नागरिकांनी मिठाई आणि फराळ खरेदी करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न प्रशासनाने केले आहे. परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत, खरेदीचे पक्के बिल घ्यावे, पदार्थांची मुदत तपासावी आणि अनैसर्गिक गडद रंग असलेले पदार्थ खरेदी करणे टाळावे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दिवाळीच्या गोडधोड पदार्थांमधून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाची ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत असून, सणासुदीच्या काळात अशा तपासण्या अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.












