अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार !
चार महिने उलटूनही, पीक विम्याची रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ
फोंडाघाट (प्रतिनिधी) : “नेहमीच येतो मग पावसाळा ss” याप्रमाणे दरवर्षी, बागायतदारांनी विमा नुकसान भरपाई चार महिने उलटून सुद्धा, न मिळाल्याचा टाहो फोडायचा ? आणि मग रडतकडत विमा कंपन्यांनी ४५ ते ६५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करायची ? अशी अवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा- काजू बागायतदार यांची गेली तीन-चार वर्षे झाली आहे. निसर्ग जेवू घाली ना ! आणि राज्य- केंद्र शासन भीक मागू देईना ! अश्या वाईट अवस्थेतून बागायतदार सध्या जात आहेत.
वस्तुतः हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसात त्या-त्या वर्षाच्या हवामानावर आधारित,आंबा- काजू नुकसान भरपाई विमा कंपनीने द्यावयाची असते. विविध कारणे सांगून विमा कंपनी, त्यातही वरदहस्त असल्यामुळे, रिलायन्स कंपनी नुकसान भरपाई देण्यास तीन-चार महिने टाळाताल आणि विलंब लावीत आहे.केंद्र सरकारने आपला वाटा दिला असताना, राज्य सरकारने आपला वाटा न दिल्याचे विमा कंपनीकडून सूचित केल्याने, विलंब होत असल्याचे कळते. या चोर-शिपाई च्या खेळात तीन-चार महिन्याच्या विलंबामुळे बागायतदारा पुढे जीव घेणी आव्हाने उभे राहत आहेत. या समस्येला पश्चिम घाटावरील नेत्या प्रमाणे सिंधुदुर्गात कोण ? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे हवालदिल,कर्जबाजारी झालेल्या बागायतदारांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी आंबा- काजु पीक विम्याच्या चालू वर्षाची नुकसान भरपाई प्रत्येक बागायतदार यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा सर्व बागायतदारांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
गेली तीन-चार वर्षे विलंबाने मिळणारी नुकसान भरपाई, बागायतदाराला उसनवारी व त्यावरील व्याज भरण्यात खर्च करावी लागते.तीच नुकसान भरपाई जून- जुलै च्या महिन्यात मिळाल्यास बागांची साफसफाई, मशागत, खते, औषध फवारणी, मजुरीसाठी वेळेवर मिळेल. उसनवारी करावी लागणार नाही. किंबहुना बागायतदार आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्याला शासनाचे प्रोत्साहन मिळेल. तरी याचा सर्वंकष- गांभीर्याने विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधी नी विमा कंपनीला रेटा लावून, चालू वर्षाची बागायतदारांच्या हक्काची पीक विमा नुकसान भरपाई, आचारसंहिता लागण्यापूर्वी खात्यावर जमा करण्यास भाग पाडावे, असा आर्त टाहो,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा- काजू बागायतदारांनी फोडला आहे. याची नोंद घ्यावी अशी आग्रही विनंती करण्यात येत आहे.