नवरात्री नऊ रुपे तुझी,सर्व मंगल मांगल्ये ssअंबे s उदे sss —च्या जयघोषात देवी दुर्गामातेला साश्रूपूर्ण निरोप !

नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली येथील नवरात्रोत्सवाची यशस्वी सांगता !

उगवाई घाटावर दुर्गा मातेचे ढोल- ताशाच्या गजरात, मिरवणुकीने जल्लोषात विसर्जन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदाना वर ” नवदुर्गा युवा मंडळ ” आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सांगता, भक्तीमय वातावरणात, शेकडो भावीक,अबाल वृद्ध, महिला- पुरुष, ग्रामस्थ, तरुणाई आणि मंडळाचे कार्यकर्ते यांचे उपस्थितीत ढोल- ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, विसर्जन मिरवणुकी द्वारे करण्यात आली. नवीन कुर्ली वसाहत ते फोंडा हवेलीनगर -बाजारपेठ -मारुती वाडी, दुर्गा मातेच्या जयकारांनी दुमदुमली.शिस्तबद्ध मिरवणूक, त्यामध्ये फेर धरलेल्या महिला, थिरकणारी युवाई,वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मंडळाचे ड्रेसकोड ने सज्ज कार्यकर्ते,ढोल वादन आणि विसर्जन मिरवणुकीतून रयतेला शुभाशिष देणारी भव्य दुर्गा मातेची आकर्षक मूर्ती, जागोजागी प्रणाम करणारे भाविक ,महिला- पुरुष यामुळे या लक्षणीय विसर्जन मिरवणुकीचे कौतुक होत होते.

गेली २२ वर्ष या मंडळाकडून सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने चालू वर्षी शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ घटस्थापना ते विजयादशमी- दसरा या काळात विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सांस्कृतिक उपक्रमात वेशभूषा स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, मुला- मुली व महिलांसाठी दांडिया नृत्य स्पर्धा, फुगडी नृत्य, इत्यादी तर धार्मिक विभागात भजन- प्रवचन- पूजाअर्चा आणि सामाजिक उपक्रमात रक्तदान शिबिर, व्याख्याने ,मदत कार्य, विविध सत्कार इत्यादी उपक्रम पार पडले. या सर्व उपक्रमात नवी कुर्ली वसाहतीतील तमाम ग्रामस्थ- उवाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उत्सवाला माजी सभापती मनोज रावराणे यांनी उपस्थित राहून, तर आमदार नितेश राणे यांनी शुभसंदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.

उशिरापर्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडलेल्या, विसर्जन सोहळ्याची सांगता, उगवाई घाटावर आरती- गाऱ्हाने, प्रसाद वाटप होऊन साश्रूपूर्ण करण्यात आली. यावेळी असंख्य भावी ग्रामस्थ- महिला पुरुष- तरुणाई उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!