कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या आणि कोकण रेल्वेच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रत्नागिरी येथील विकास पेजे यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल कोकण रेल्वेच्या वतीने गौरविण्यात आले.
कोकण रेल्वेच्या विविध विभागाती कर्मचाऱ्यांना दरवर्षी वार्षिक स्थापना दिना दिवशी भव्य सोहळ्यात गौरविण्यात येते. त्याच अनुषंगाने यावर्षी मडगाव गोवा याठिकाणी संपन्न झालेल्या ३४ व्या वार्षिक स्थापना दिवस कार्यक्रमात कोकण रेल्वेत मागील अनेक वर्षे सातत्याने कामगिरी करत सेवा करणाऱ्या विकास विश्वनाथ पेजे यांना यावर्षीचा डायरेक्टर लेव्हल ( फायनान्स) वैयक्तिक पातळी अवॉर्ड – २०२४ आणि सांघिक प्रकारातील सी.एम.डी.लेव्हल ग्रुप अवॉर्ड (CMD level group Award) प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष झा यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेचे राजेश बडंग, रामकृष्ण हेगडे तसेच मडगाव (गोवा) येथील चीप प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र कांबळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोकण रेल्वेत मागील अनेक वर्षे आपली सेवा देताना विकास पेजे यांनी रेल्वेच्या विविध विभागात काम केले. काम करत असताना आपल्या सोबतच्या सर्वच सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच आपल्या सातत्यपूर्ण कामाने कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या उद्दिष्टानुरूप व अपेक्षानुरूप काम करून सर्वांना सोबत नेण्याची प्रमुख भूमिका निभावली. त्यासोबतच आपली रेल्वेतील सेवा करत असताना तसेच सामाजिक भान जपताना अनेकदा सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर संवेदनशीलतेने आपली वैचारिक बाजू मांडत आपल्यातील विविध गुणांचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीची निकषांच्या आधारे योग्य दखल घेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने त्यांचा दोन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
विकास पेजे हे रत्नागिरी तालुक्यातील नाचणे या गावचे सुपुत्र असून त्यांनी आपल्या कार्याने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. विकास पेजे हे लोकनेते कै.शामराव पेजे यांचे नातू आहेत. तसेच विकास पेजे यांना आपल्या आजोबांप्रमाणे समाजसेवा, राजकारण, शैक्षणिक, क्रीडा, क्षेत्रामध्ये प्रचंड आवड आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील बहुजन समाजाचे ते नेते आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाला कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये ३३ वर्ष प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. कोकण रेल्वेच्या इतिहासात प्रथमच डायरेक्टर लेवल (फायनान्स) वैयक्तिक पातळी अवार्ड 2024 आणि सांघिक प्रकारातील सी.एम.,डी. लेव्हल ग्रुप अवार्ड असे दोन पुरस्कार मिळालेले कर्मचारी आहेत.
तसेच ते ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे रत्नागिरी जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा रेल्वे विभागात मोठा जनसंपर्क आहे. याच संपर्काच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. ओबीसी जनजागृती, कर्मचारी प्रबोधन, शैक्षणिक मार्गदर्शन, सामाजिक कार्याचा प्रसार, समाज संघटन, महिला सक्षमीकरण, आरोग्य, कामगार कल्याण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
म्हणूनच त्यांच्या याच गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेऊन कोकण रेल्वेने त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.











