उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश निषिद्ध चा बॅनर लावत पुकारले निवडणुकीवर बहिष्काराचे सघन अभियान.
चौके (प्रतिनिधी) : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नांदोस चव्हाणवाडीतील नागरिकांनी आपल्या समस्या उघडपणे मांडल्या आणि आपली अस्वस्थता व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांपासून सतत दुर्लक्षित असलेल्या नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर रस्त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. पावसाळा सुरू होताच या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते, ज्यामुळे नित्यप्रवासी, विद्यार्थ्यांसह वृद्ध आणि आजारी नागरिकांना वाटचाल करताना प्रचंड कष्ट सोसावे लागतात. संपूर्ण पावसाळ्याच्या हंगामात, जूनपासून ते जानेवारीपर्यंत रस्त्याच्या या बिकट अवस्थेमुळे मागासवर्गीय समाजाचे चांभार आणि महार बांधव दररोज त्रस्त होतात. पाण्यातून गाड्या चालवताना लोकांना अक्षरशः कसरत करावी लागते आणि अशा अपुऱ्या रस्त्यामुळे वर्षानुवर्षे अनेक छोटे-मोठे अपघात होत आले आहेत. स्थानिक रहिवाशांच्या मते, या अपघातांची संख्या खूपच वाढली आहे, पण राजकीय पक्ष किंवा प्रशासनाने यावर ठोस उपाय केलेला नाही.
सदर मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून एकाच आमदाराचे वर्चस्व असूनही या रस्त्याची दुरवस्था कायम आहे, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता नागरिकांनी ठरवले आहे की रस्ता पूर्णतः दुरुस्त होईपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला मतांसाठी या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी देणार नाहीत. जो कोणी या रस्त्यावर मतांसाठी पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेल, त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी करून निषेध दर्शवला जाईल असा राजकीय पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे.
नागरिकांनी ठाम शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला की, “आम्हाला आश्वासन नको; आता फक्त कृती हवी आहे.” त्यांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आश्वासनं मिळाली आहेत, पण प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
महार आणि चांभार समाजाच्या प्रतिनिधींनीही या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी गावभेट घेण्याचे ठरवले आहे. प्रत्येक समाजातील सदस्यांना भेटून आपल्या समस्या उघडपणे मांडण्यात येणार आहेत. यातून लोकांना एकत्र आणून या अन्यायाविरुद्ध एकसंध आवाज उठवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर रस्त्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने त्वरित सुरूवात करावी जर या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार हा निवडणुकीवर थेट परिणाम करू शकतो. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घेतल्यासच नागरिकांचा संताप कमी होईल











