खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे येथे सदाशिव पांचाळ ट्रेनिंग अकॅडमी सिंधुदुर्ग आणि क्युरियस माईंड गोवा यांच्या संयुक्त विद्यामाने रोबोटिक्स मार्गदर्शन कार्यशाळा शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि.१२ रोजी उत्साहात संपन्न झाली.
“आजचे जग हे स्पर्धेचे असून मुलांनी वैचारिक व तांत्रिक दृष्टीने पुढे असले पाहिजे. तर आजच्या परिस्थितीला शालेय विद्यार्थ्यांना जुळवून घेता आले पाहिजे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थाबरोबर शाळेतील शिक्षकांनी देखील सहभाग घेतला होता.
क्युरियस माईंड ही गोव्यातील संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून या संस्थेचे प्रतिनिधी कल्पक नायक आणि सदाशिव पांचाळ यांनी रोबोटिक्स संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोबोट आणि आपण याबद्दल सांगताना शालेय विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स किट स्वतः हाताळून मॉडेल तयार केले. तर दोन दिवसाच्या या कार्यशाळेत चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यार्थांनी खूप आनंद समाधान व्यक्त केले.










