अंगणवाडी पेंडूर तळीवाडी जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात संपन्न

चौके (प्रतिनिधी) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मालवण अंतर्गत बीट चौके क्र. १ च्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम अंगणवाडी पेंडूर तळीवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रिया बावकर, ग्रामपंचायत खरारे पेंडूर सरपंच नेहा परब, तसेच ग्रामपंचायत अधिकारी शुभदा कोठावळे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मालवण चौके बीट च्या मुख्यसेविका सुवर्णा भगत, आरोग्य उपकेंद्र पेंडूर चे डॉ. सिद्देश कदम, माता-पालक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीट चौके क्र. १ च्या पर्यवेक्षिका भगत मॅडम यांनी केले. पंचायत समिती सदस्य रिया बावकर यांनी स्तनपानाचे आई व बाळाच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. सरपंच नेहा परब यांनी स्तनपानाबाबत माता तसेच कुटुंबातील सदस्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले व ग्रामपंचायत अधिकार शुभदा कोठावळे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत अशा जनजागृती उपक्रमांचे कौतुक केले. तसेच डॉ. सिद्धेश कदम यांनी मातेच्या गर्भधारणे पासून ते बाळ 2 वर्षापर्यंत ची माहिती व लसीकरणाची आवश्यकता समजावून सांगितली, आशा सेविका गावडे मॅडम यांनी गरोदर मातेची पूर्व तयारी कशी असावी या विषयी मार्गदर्शन केले. पेंडूर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस स्तनपान संदर्भात रोल प्ले सादर करून स्तनपानाविषयी प्रभावी जनजागृती केली.

error: Content is protected !!