फोंडाघाट (प्रतिनिधी) : पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप २०२६-२७ स्पर्धेत फोंडाघाट येथील दोन युवा शेतकरी विश्वास जोईल व अक्षय परब यांनी स्थापन केलेल्या शिवार्थ शेतकरी गटाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भातशेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविले आहेत. या उल्लेखनीय कामाची दखल घेत पाणी फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर अॅड. रवींद्र पोभणे व उपविभागीय समन्वयक प्रशांत गवंडी यांनी शिवार्थ शेतकरी गटाला भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली.
पाणी फाउंडेशनचे समन्वयक मनीष पेडणेकर व शुभम कुरंवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने भात पिकामध्ये श्री पद्धतीने भात लागवड, योग्य खत व्यवस्थापन, पीक नियोजन तसेच आधुनिक व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग राबविले. युवा शेतकरी विश्वास जोईल व अक्षय परब यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी कोळपणीचे काम कमी वेळेत व कमी कष्टात व्हावे यासाठी ब्रश कटरचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या यंत्राचे प्रात्यक्षिक अक्षय परब यांनी करून दाखविले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भातशेती अधिक सुलभ, कमी खर्चिक आणि कार्यक्षम कशी करता येऊ शकते, याचे प्रत्यक्ष उदाहरण या युवा शेतकऱ्यांनी सादर केले.
यावेळी अॅड. रवींद्र पोभणे यांनी, “युवा पिढी शेतीपासून दूर जात असताना शिवार्थ शेतकरी गटातील युवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवे प्रयोग केले आहेत. त्यांचे कार्य युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार काढले.
प्रशांत गवंडी यांनी गटाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळ कृषी अधिकारी झुलपे, उप कृषी अधिकारी वेर्लेकर, स. कृ. अ. अक्षया परब, उपकृषी अधिकारी डी. डी. कांबळे तसेच पाणी फाउंडेशनची फिल्ड टीम उपस्थित होती.






















